Wednesday, August 27, 2025

वनामकृवि आणि आय.सी.ए.आर. - नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (ICAR-NBPGR), नवी दिल्ली यांच्यात सामंजस्य करार

पिकांच्या जनुक संसाधन संवर्धन व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासासाठी सामंजस्य करार... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि आय.सी.ए.आर. - नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (ICAR-NBPGR), नवी दिल्ली यांच्यातील सामंजस्य करार (MoU) आज, दिनांक २७ ऑगस्ट रोजी संपन्न झाला.

या कराराच्या निमित्ताने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ परिसरातील विविध संशोधन केंद्रांना भेट देण्यात आली. या प्रसंगी आय.सी.ए.आर. - नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्लीचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंह आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कुलदीप त्रिपाठी यांनी विद्यापीठातील मध्यवर्ती प्रक्षेत्र, बायोमिक्स युनिट, हवामान संशोधन केंद्र आणि अन्न तंत्र महाविद्यालयातील इन्क्युबेशन सेंटरला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान विविध संशोधन उपक्रम, चालू प्रकल्प आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून विद्यापीठातील प्रगत संशोधन कार्याचा आढावा घेण्यात आला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या सामंजस्य करारामुळे पिकांच्या जनुक संसाधनांचे संवर्धन, नवीन वाणांची निर्मिती, हवामान बदलास अनुरूप संशोधन तसेच नाविन्यपूर्ण कृषि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या क्षेत्रांत नवे दालन खुले होणार असल्याचे सांगितले. या सहकार्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या संशोधन प्रकल्पांसह संशोधकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामंजस्य करार आणि भेटीदरम्यान संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ राहुल रामटेके, सहयोगी संचालक (बियाणे) तसेच कृषि वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, कृषिशास्त्र विभाग प्रमुख तथा मध्यवर्ती प्रक्षेत्र प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, कृषि रसायनशास्त्र व मृदा विज्ञान विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडिकर, हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे तसेच कृषि वनस्पतिशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.













Tuesday, August 26, 2025

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी वाङ्मयीन स्पर्धा उपयुक्त – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयामार्फत आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०२५-२६ अतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. याचाच भाग म्हणून परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन विविध वाङ्मयीन (साहित्यिक) स्पर्धां यासस्वी पार पडल्या.

या स्पर्धांमध्ये तात्काळ भाषण (Extempore Speech), वक्तृत्व स्पर्धा (Elocution) आणि वादविवाद (Debate स्पर्धा) आणि प्रश्नमंजुषा (Quiz) यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपली वक्तृत्वकला, विचारमंथनाची क्षमता आणि बौद्धिक कौशल्ये प्रदर्शित केली.

या युवक महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण समारंभ दिनांक २६ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य आणि  विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदी प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धीबरोबरच स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते. तसेच वक्तृत्वकला, विचारमंथन आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी केले असून, समारंभाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले

या स्पर्धेतील स्फूर्तिवान भाषण / तत्काळ भाषण स्पर्धा (Extempore Speech) मध्ये परभणी येथील अन्न तंत्र महाविद्यालयातील लोकेश बी. गिरसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक परभणी येथील कृषि महाविद्यालयातील  शुभांगी शुक्ला तर तृतीय क्रमांक उद्यान महाविद्यालयातील महजबीन अब्बासी यांनी मिळवला.

वक्तृत्व स्पर्धेत (Elocution) परभणी येथील कृषि महाविद्यालयातील आराध्या सिंग प्रथम, उद्यान महाविद्यालयातील वैष्णवी शितोळे द्वितीय तर सीएसएमएसएस कृषि महाविद्यालय, कंचनवाडी येथील रईस सिद्दीकी तृतीय क्रमांकावर राहिले.

वादविवाद स्पर्धेत (Debate) सीएसएमएसएस कृषि महाविद्यालय, कंचनवाडी येथील रईस सिद्दीकी व सलोनी राऊत यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक उद्याने महाविद्यालय, परभणी येथील प्रिया सिंग व महजबीन अब्बासी यांनी पटकावला. तृतीय क्रमांक राजीव गांधी फूड टेक्नॉलॉजी कॉलेज, परभणी येथील साक्षी हिवाळे व झैना शेख यांना मिळाला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत कृषि महाविद्यालय, परभणी येथील श्रीराम हुलवाले यांनी प्रथम क्रमांक, सीएसएमएसएस कृषि महाविद्यालय, कंचनवाडीचे  अर्पित शाहू यांनी द्वितीय क्रमांक तर परभणी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातील सुमेध लोखंडे  यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष फुलारी आणि डॉ. धीरज पाथ्रीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. संतोष कदम, डॉ. संतोष फुलारी आणि डॉ. बी. एस. अगरकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Monday, August 25, 2025

इटलापूर येथे हळद व कपूस पिकांवरील कीड नियंत्रणावरील शेतकरी मेळावा संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी आणि उती संवर्धन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) तसेच कृषि-औद्योगिक सलग्नता उपक्रम (AIA) अंतर्गत हळद व कपूस पिकांवरील कीड नियंत्रण” या विषयावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक २५ ऑगस्ट रोजी मौजे इटलापूर (दे.), ता. व जि. परभणी येथे करण्यात आले.

मेळाव्याचे अध्यक्षस्थान सौ. जयश्री मोतीराम खटिंग, सरपंच, इटलापूर यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, तसेच कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर उपस्थित होते. मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. विक्रम घोळवे आणि डॉ. दिगंबर पटाईत यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी शास्वत शेती उत्पादनासाठी माती परीक्षणाचे महत्व विशद केले.

या मेळाव्याचे यशस्वी आयोजन डॉ. एस. एन. पवार, डॉ. के. एम. शर्मा आणि डॉ. अनिल धमक यांनी केले. तसेच इटलापूर-मांडवा येथील कृषि कन्या आणि कृषि दूत यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी माहितीपत्रके वाटली तसेच शेतात जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

मेळाव्याचे प्रास्ताविक श्रेया कच्छवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी मुखरे यांनी तर आभार प्रदर्शन अप्पासाहेब मदन यांनी केले.

मेळाव्यात हळद आणि कपूस यांसारख्या प्रमुख पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन, शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी लागणारे उपाय या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विविध शंका मांडून समाधानकारक मार्गदर्शन घेतले.

या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढ, तसेच कीड व रोग व्यवस्थापन या सर्व बाबतीत उपयुक्त माहिती मिळाली असून, कृषि उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी हा मेळावा अत्यंत उपयुक्त ठरला.


इंदेवाडी येथे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रामकन्या व ग्रामदूत दाखल

 रावे कार्यक्रमाचा केला प्रारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाची अंमलबजावणी यावर्षी मौजे इंदेवाडी (ता. व जि. परभणी) येथे करण्यात आली आहे. या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना ‘ग्रामकन्या’ आणि ‘ग्रामदूत’ म्हणून नामनिर्देशित करण्यात आले असून ते सर्व आज, दिनांक २५ ऑगस्ट रोजी मौजे इंडेवाडी येथे दाखल झाले आहेत.

हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणार आहे. गावात दाखल होताच ग्रामकन्या व ग्रामदूत यांनी रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांच्या उपस्थितीत सरपंच श्री अशोक कच्छवे, ग्रामसेवक श्री हनुमान कच्छवे, कृषी पदवीधर व प्रगतशील शेतकरी श्री संजयअण्णा सिसोदिया यांच्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मदतनीस श्री माधव कच्छवे, ग्रामस्थ श्री विष्णू कच्छवे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. शंकर पुरी यांनी या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थिनींना ग्रामीण समाजाशी जोडणे, शेतकरी कुटुंबात राहून त्यांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीची जाण करून घेणे तसेच शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हे या उपक्रमामागचे प्रमुख ध्येय आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना गावातील कुटुंबांमध्ये राहण्याची संधी मिळणार असून त्यातून त्यांचे निरीक्षण, अनुभव व प्रशिक्षण अधिक परिणामकारक होणार आहे. या कुटुंबांनाही शास्त्रोक्त बालसंगोपन, संतुलित आहार व पोषण, दैनंदिन कामे करत असताना होणारे काबाडकष्ट कमी करण्याची तंत्रे, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आदी विषयांवर  हे विद्यार्थी  मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात एकूण १० आठवड्यांसाठी सुरू राहणार असल्याची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. तसेच रावे कार्यक्रमातील विविध उपक्रमांविषयी ग्रामस्थांना जागरूक करून ग्रामकन्या व ग्रामदूतांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यानंतर सरपंच श्री अशोक कच्छवे व ग्रामसेवक श्री हनुमान कच्छवे यांनी विद्यार्थिनींना संपूर्ण कार्यक्रमात सहकार्य व आपुलकीचा भाव देण्याची ग्वाही दिली. कृषी पदवीधर व प्रगतशील शेतकरी श्री संजयअण्णा सिसोदिया यांनी सर्व चमूला त्यांच्या घरी नेऊन आदरातिथ्य केले. उपसरपंच श्रीमती मीरा चंदेल यांनीही या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अन्न विज्ञान व पोषण विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, साधन संपत्ती व्यवस्थापन व ग्राहक विज्ञान विभाग प्रमुख तसेच मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. निता गायकवाड, वस्त्र व परिधान अभिकल्पना विभाग प्रमुख डॉ. वीणा भालेराव आणि सामुदायिक विस्तार व संदेशवहन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. शंकर जी. पुरी यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकीही मजबूत होईल, असा विश्वास रावे आयोजकांनी व्यक्त केला आहे.



Sunday, August 24, 2025

आधुनिक तंत्रज्ञान विकास व अवलंब यामध्ये कृषि अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

कृषि यांत्रिकीकरण, मृद व जलसंधारण, उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी कार्यक्षम वापर, कृषि मालाची प्रक्रिया व मूल्यवर्धन, नियंत्रित व काटेकोर शेती पद्धती, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर तसेच ड्रोन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान विकास व अवलंब या सर्व बाबींमध्ये कृषि अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे आयोजित कृषि अभियांत्रिकीतील उद्योगाच्या संधी” या कार्यक्रमानिमित्त त्यांनी आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके, इंजी. भालचंद्र पेडगावकर, इंजी. वैभव आजेगावकर आणि जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे उपस्थित होते.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविणे हे आगामी काळात मोठे आव्हान ठरणार आहे. प्रति व्यक्ती धारणा कमी होत असल्यामुळे, उपलब्ध माती व पाण्याचा कार्यक्षम वापर करून शेतीची उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. कृषि विकासात कृषि अभियांत्रिकी पदवीधरांची भूमिका अत्यंत मोलाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. राहूल रामटेके यांनी केले. त्यांनी सांगितले की, बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) पदवीधरांना शासकीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खासगी कंपन्यांमध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. तसेच अनेक पदवीधरांनी स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे आणि डॉ. अनिकेत वाईकर यांनी करून दिला.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात इंजी. भालचंद्र पेडगावकर यांनी सांगितले की, कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना सिंचन कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. तसेच अनुभवाच्या आधारे स्वतःचा उद्योग उभारण्याचीही संधी मोठ्या प्रमाणात आहे.

इंजी. वैभव आजेगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, शिक्षण घेत असताना ध्येय ठरवून सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास हमखास यश मिळते. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना ट्रॅक्टर कंपन्या, सिंचन साधन निर्मिती, सौर ऊर्जा उपकरणे, कृषि प्रक्रिया उद्योग, हरितगृह उभारणी तसेच मृद व जलसंधारणाच्या कामांमध्ये रोजगार व उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. मदन पेंडके, डॉ. सुमंत जाधव, डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. शैलजा देशवेना, श्री. अशोक अण्णा देशवेना तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुकर मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुभाष विखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. प्रमोद राठोड, विद्यार्थी समर्थ असुटकर, वरद विनोरकर, राध्येशाम खटींग, सतेज मेटकर इत्यादींनी परिश्रम घेतले.






Friday, August 22, 2025

वनामकृविच्या शेतकरी-शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवादाच्या ६०व्या भागात सततच्या पावसानंतर पिकांच्या संरक्षणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 पाण्याचा निचरा, अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांचा योग्य वापर ही त्रिसूत्री शेतकऱ्यांनी अवलंबवावी....

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद” या उपक्रमाचा ६० वा भाग माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २२ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमात सततच्या पावसानंतर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांमध्ये घ्यावयाची काळजी” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी सोयाबीन पिकातील रोग, खत व्यवस्थापन आणि काळजी घेण्याच्या उपाययोजना स्पष्ट केल्या. तसेच सहयोगी कृषिविद्यावेत्ता डॉ. अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकातील कीड व रोगनियंत्रण तसेच सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचावासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यांनी नमूद केले की, विद्यापीठ माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी देवो भव:” या भावनेतून अविरत विस्तार कार्य करत असून आज या उपक्रमाचा ६० वा भाग अखंडितपणे यशस्वीरीत्या संपन्न होत आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी आठवड्याचा हवामानाचा अंदाज सांगून पिकासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकात वाफसा स्थिती, वाढती आर्द्रता आणि अपुरे खत व्यवस्थापन यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर प्रा. अरुण गुट्टे यांनी सांगितले की, सध्या सोयाबीन पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून आर्द्रतेमुळे मुळकुज, शेंगा करपा तसेच तुर मर या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. यासाठी योग्य वेळी नियंत्रणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोग नियंत्रणासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा प्रती एकर ४ किलो वापरण्याचा सल्ला देत त्यांनी स्पष्ट केले की रासायनिक बुरशीनाशकांच्या तुलनेत जैविक बुरशीनाशकांचा परिणाम अधिक चांगला होतो. तसेच पिकाचे संरक्षण करण्यासाठी पाण्याचा निचरा, अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांचा योग्य वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकांवरील खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण व वाढ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सततच्या पावसामुळे कापूस पिकांमध्ये आकस्मिक मर व उमळणे यांसारख्या समस्या दिसून येत आहेत. पावसामुळे मातीतील हवा खेळती नसल्याने पिकांना जमिनीतून अन्नद्रव्ये घेण्यात अडचण येत आहे. अशा परिस्थितीत ब्लू कॉपर आणि युरियाची आळवणी करून पायाने दाबण्याची पद्धत अवलंबावी, आणि हे काम २४ ते ४८ तासांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, विद्राव्य खतांचा योग्य वापर आणि पिकांच्या वाढ व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजनाही त्यांनी स्पष्ट केल्या.

या संवादातून शेतकऱ्यांना पिक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच आधुनिक तंत्रज्ञानाविषयी उपयुक्त माहिती मिळाली. याशिवाय, सद्यस्थितीतील हवामान बदलानुसार पिकांची, फळपिकांची व पशुधनाची काळजी तसेच इतर अनुषंगिक बाबींवर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ. दिगंबर पटाईत, प्रा. अरुण गुट्टे आणि डॉ. अरविंद पांडागळे यांनी समाधानकारक उत्तरे देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात बैलपोळा उत्साहात साजरा

 बैलपोळ्यामुळे आपल्या पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

महाराष्ट्रातील शेतकरी संस्कृतीतील महत्त्वपूर्ण असलेल्या बैलपोळा सणानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागात आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विद्यापीठ परिसरातील बैलांना स्वच्छ धुऊन, रंगीबेरंगी कापडं, गोंडे, मणीमालांनी आकर्षक सजावट करण्यात आली. शिंगांना रंग देऊन पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करण्यात आले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते बैलांचे पूजन करून नैवेद्य खावू घालण्यात आला.

कार्यक्रमास विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य माननीय श्री भागवत देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता इंजिनिअर श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री प्रविण निर्मळ, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांसह विभागातील प्राध्यापक, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, बैलपोळ्यामुळे आपल्या पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक होते. ग्रामीण भागातील सामुदायिक ऐक्य वाढविण्यासाठी आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. शेती, बैल, पाऊस, जमीन आणि निसर्ग यांचा परस्परांशी घट्ट संबंध आहे. बैलपोळ्याद्वारे शेतकरी निसर्गाशी असलेले आपले नाते साजरे करतात, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे आयोजन पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. रमेश पाटील, डॉ. प्रभाकर पडघन तसेच आचार्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

याबरोबरच विद्यापीठ मुख्यालय आणि कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयामध्ये बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.