Wednesday, December 19, 2012

नैसर्गिक जैव साखळया नष्‍ट होउन जैवविविधता संपत चालली आहे


नैसर्गिक जैव साखळया नष्‍ट होउन जैवविविधता संपत चालली आहे
      मा.कुलगुरू डॉ. किशनराव गोरे

जगातील जैवविविधता नष्‍ट होण्‍याचा वेग प्रचंड असुन विकासाला पर्यावरण संरक्षणाच्‍या अटी न लावल्‍याने लागवडीखाली असलेली जमीन व पिकाच्‍या उत्‍पादकतेवर संकट आले असून मोठया संशोधनाची व जनजागरणाची गरज असल्‍याचे प्रतिपादन मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांनी हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयात ‘जैवविविधता व निसर्गाचे संवर्धन’ या विषयावर दिनांक 14 व 15 डिसेंबर रोजी आयोजीत राष्‍ट्रीय परिषदेच्‍या उदघाटन ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. किशनराव गोरे पुढे म्‍हणाले की, भारतात जगातील सर्वोत्‍कृष्‍ट जैवविविधता पाहण्‍यात मिळते; पण वाढत्‍या लोकसंख्येने सिमेंटची जंगले वाढत चालली आहेत, त्‍यासोबत नैसर्गिक जैव साखळया नष्‍ट होउन जैवविविधता संपत चालली आहे. विकासाच्‍या प्रक्रियेसोवत पर्यावरण रक्षणाच्‍या अटी आपण लावू शकलो नाही, त्‍यामुळे एकीकडे सिमेंटचे जंगल, तर दुसरीकडे वाळवंट अशी स्थ्‍िाती झाली आहे.
पावसाची अनियमितता व तापमान वाढीचे परिणाम आता पिकाच्‍या उत्‍पादनावर होउ लागले आहेत. दरवर्षी नवनवीन रोग पिकावर येउ लागले आहेत. केंद्राने वर्ष 2002 मध्‍ये राष्‍ट्रीय जैवविविधता संरक्षण प्रणाली निश्चित केली. या शिवाय आजूबाजूच्‍या परिसरात जैवविविधतावरील संकटाच्‍या संदर्भात जनजागरण व संशोधन या दोन्‍ही गोष्‍टींची आवश्‍यक्‍ता आहे. जमिनीची सुपीकता झपाटयाने कमी होउ लागली असुन पिकाच्‍या उत्‍पादकतेवर देखील संकट येत आहे.
    या वेळी व्‍यासपीठावर सुप्रसिध्‍द वैज्ञानिक तथा राष्‍ट्रीय जैवविविधता समितीचे सदस्‍य डॉ. बबनराव इंगोले, संस्‍‍थेचे पदाधिकारी श्री धरमचंद बडेरा, डॉ. वाय. टी. खिल्‍लारे, प्राचार्य डॉ. बर्वे, डॉ. रेडडी, डॉ. सिन्हा, डॉ. बी. एस. साळवे आदी सह पत्रकार, प्राध्‍यापक, विदयार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी संस्‍थाध्‍यक्ष एकनाथदादा नीलावार यांच्‍या संदेशाचे वाचन करण्‍यात आले. विशेष स्‍मरणिकेचे प्रकाशन करण्‍यात आले. सूत्रसंचालन डॉ. कुलकर्णी यांनी केले. प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. बर्वे व समन्‍वयक डॉ. साळवे यांनी केले. प्रा. पी. पी. जोशी यांनी आभार मानले.