Wednesday, July 31, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्‍ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश पुर्णत: ढगाळ राहून औरंगबाद, बीड, उस्‍मानाबाद, परभणी, व हिंगोली जिल्‍हयात हलक्‍या स्‍वरूपाचा तर लातुर व नांदेड जिल्‍हयात हलका ते मध्‍यम तर तुरळक ठिकाणी भारी स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ११.० ते २०.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१.० ते ८९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५०.० ते ७७.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश पुर्णतः ढगाळ राहून औरंगबाद, बीड, उस्‍मानाबाद, परभणी, व हिंगोली जिल्‍हयात हलक्‍या स्‍वरूपाचा तर लातुर व नांदेड जिल्‍हयात हलका ते मध्‍यम तर तुरळक ठिकाणी भारी स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

शेतकरी बांधवांना कृषि सल्‍ला 
  • खरीप ज्‍वारीचे पिकात कोळपणी करून तणाचे नियंत्रण करावे. खोडमाशीच्‍या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४० टक्‍के २० मिली + स्टिकर १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • सोयाबीनचे पिकात कोळपणी करावी. पाने खाणा-या अळयांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस २० टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी. पानवरील ठिपके रोगाचे नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड -२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.
  • साचे पिकात वापसा येताच खंदणी करून पिकास मातीची भर द्यावी.(बांधनी करावी).
  • बागायात / जीरायत कापूस पिकास तुडतुडे व फुलकिडयांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍यांच्‍या नियंत्रणसाठी अॅसिफेट ७५ टक्‍के/फिप्रोनील ७५ टक्‍के २० मिली किंवा डायमिथोएट ३० टक्‍के, १० मिली किंवा असिटामेप्रीड २० टक्‍के २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. पानावरील ठिपके रोगाच्‍या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.
  • पावसाचे पाणी आळयातून बाहेर काढून द्यावे. मृगबाहार धरलेल्‍या शेतक-यांनी संत्रा मोसंबी पिकास ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड आळयातून द्यावा.
  • पेरूवरील देवी रोग व फळमाशीच्‍या नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम + मॅंकोझेब (१० ग्रॅम + २० ग्रॅम) + ५० टक्‍के कार्बोरील २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • भाजीपाला पिकावरील करपा, पानावरील ठिपके व केवडा रोगाचे नियंत्रणासाठी मॅंकोझेब किंवा कॉपर अझीक्‍लोराईड २५ ग्रॅम + ट्रायडेमॉर्क १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • या वर्षी पाउस समाधानकारक आहे. काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्‍त पाउस पडत आहे. जास्‍त पाउसामुळे पिके पिवळी पडली आहेत. त्‍यामुळे शेतक-यांनी शेतीतील जास्‍तीचे पाणी योग्‍य प्रकारे शेताबाहेर काढुन द्यावे. जेणेकरून शेतात जास्‍तीचे पाणी साठणार नाही व मातीची धुपही होणार नाही.


सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक ृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः ३१                                              
दिनांकः ३०.०७.२०१३