दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या नॅनो तज्ञा डॉ रत्नमाला चॅटर्जी मार्गदर्शन करतांना |
कॅन्सर सारख्या आजारामध्ये
केमोथेरपीमुळे रूग्नास अनेक दुष्परीणामास सामोरे जावे लागते, नॅनो
तंत्रज्ञानामुळे हया प्रकारचे दुष्परिणाम कमी होणार आहे. नॅनो तंत्रज्ञानात मनुष्याचे
जीवन सुकर करण्याची मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या
आंतरराष्ट्रीय किर्तीच्या नॅनो तज्ञा डॉ रत्नमाला चॅटर्जी यांनी केले. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘नॅनो तंत्रज्ञान : एक संशोधनात्मक दृष्टिक्षेप’ याविषयावर नॅनोतज्ञा डॉ रत्नमाला चॅटर्जी
यांचे व्याख्यान गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त
विद्यामाने आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक
तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे होते तर संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर व
कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व
प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता व
प्राचार्य डॉ बी व्ही आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानात
त्या पुढे म्हणाल्या की, कृषि क्षेत्रात अधिक उत्पादनासाठी, किड व रोगाचे
निदान व व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, उर्जा बचत, दुग्ध शास्त्र आदी शाखेत
नॅनो तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार आहे. यावेळी त्यांनी पॉवर पाईन्टच्या
मदतीने नॅनो तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्ष समारोपीय भाषणात
शिक्षण संचालक डॉ विश्वास शिंदे म्हणाले की, नॅनो तंत्रज्ञानामुळे शेती
क्षेत्रात क्रांतीकारक बदल होणार आहे. उपलब्ध तंत्रज्ञानाने न सोडविण्यात येणारे
कृषि क्षेत्रातील अनेक प्रश्न नॅनो तंत्रज्ञानाने आपण सोडवु शकु.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा
विशाला पटणम यांनी केले. सुत्रसंचलन डॉ विना भालेराव तर आभार प्रदर्शन डॉ जया
बंगाळे यांनी केले. व्याख्यानास विद्यार्थी, प्राध्यापकवृंद व कर्मचारीवृंदानी मोठया
संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात गृहविज्ञान महाविद्यालयचा ‘गृहविज्ञान आपल्या दारी : कुटूबाचे कल्याण करी‘ या अभिनव विस्तार शिक्षण
कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.