Wednesday, November 27, 2013

‘गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी’ अभिनव उपक्रमास ग्रामीण महिलांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद





वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृह विज्ञान महाविद्यालय, परभणी तर्फे मराठवाड्यातील विविध खेड्यातून ज्ञान प्रबोधनाचे कार्य करण्‍याच्‍या दृष्‍टीने गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी अभिनव अभियानाचे उदघाटन नुकतेच आय. आय. टी. दिल्‍ली येथील आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या प्राध्‍यापिका डॉ. रत्‍नमाला चटर्जी, शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री काशीनाथ पागिरे, गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम यांच्‍या उपस्थितीत पार पडला. अभियानामध्‍ये निवडक शंभर गावात वेगवेगळ्या चमुंद्वारे शनिवारी वेगवेगळ्या महत्‍वाच्‍या विषयांवर ग्रामस्‍थ व त्‍यांच्‍या कुटूंबियांना गृह विज्ञान ज्ञान विषयक माहिती देऊन त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा उंचावण्‍यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमांतर्गत प्रभावीपणे मल्‍टीमीडीयाचा उपयोग करुन तसेच प्रात्‍यक्षिके दाखवून महिलांना, विद्यार्थ्‍यांना तसेच ग्रामस्‍थांना महत्‍वाच्‍या विविध कौटुंबिक आणि वैयक्तिक सक्षमीकरणासंबंधी सजग करण्‍यात येणार आहे. या करिता दृकश्राव्‍य साधने, मल्‍टीमिडीया, प्रदर्शने, व्हिडीओ फिल्‍म, साउंड बार, प्रात्‍यक्षिके, प्रत्‍यक्ष अनुभव इ. प्रभावी साधने व पध्‍दतीचा उपयोग करण्‍यात येणार आहे. अभियानांतर्गत पहिल्‍या फेरीमध्‍ये हिंगोली जिल्‍ह्यातील हट्टा, आडगांव आणि बोरी सावंत या उपक्रमास प्रत्‍यक्ष प्रारंभ करण्‍यात आला, त्‍यास ग्रामीण महिलां, विद्यार्थी तथा ग्रामस्‍थानी उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. हट्टा येथे डॉ. रत्‍नमाला चटर्जी यांनी भेट देऊन सरपंच व उपस्थित महिलांशी संवाद साधला व उपक्रमास शुभेच्‍छा दिल्‍या. या कार्यक्रमात सदरील गावामध्‍ये महिलांना गर्भावस्‍थेत घ्‍यावयाची काळजी व महत्‍व या विषयावर सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम यांनी तर सक्षम गृहिणींच्‍या आवश्‍यक जबाबदा-या व याकरीता घ्‍यावयाची विशेष खबरदारी व शेतीमधील कष्‍ट्प्रद कामे कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त शेती अवजारे या विषयांवर विभाग प्रमुख डॉ. हेमांगीनी सरंबेकर यांनी मार्गदर्शन केले. मौजे आडगांव आणि बोरी सावंत येथे गृह विज्ञान शिक्षण आणि दर्जेदार बाल शिक्षणाची गरज या विषयांवर अनुक्रमे डॉ. जया बंगाळे व डॉ. वीणा भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्‍या शेवटी तज्ञांनी केलेल्‍या मार्गदर्शनावर आधारित प्रश्‍न मंजुषा घेवून अचुक उत्‍तरे देणा-या लाभार्थ्‍यांना उत्‍कृष्‍ट श्रोता पुरस्‍कार देण्‍यात आले. इलेक्‍ट्रॉनिक साधनांच्‍या सहाय्याने उपयुक्‍त घोषवाक्‍यांच्‍या माध्‍यमातून गावांमधून जागरुकता निर्माण केली. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. प्रभा अंतवाल, डॉ. शंकर पुरी, चित्रा बेलूरकर, रेश्‍मा शेख, ज्‍योत्‍स्‍ना नेर्लेकर, संगीता नाईक, मंजुषा रेवणवार, रुपाली पतंगे व अर्चना भोयर आदीनी परीश्रम घेतले.