आदिवासी उपयोजनातंर्गत हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुक्यातील वाई गांवात शेतकरी मेळावा संपन्न
![]() |
शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु |
![]() |
शेतकरी मेळाव्यास उपस्थित आदिवासी शेतकरी व महिला शेतकरी |
***********************
मनुष्य आपल्या दैनंदिन गरजाच्या
वस्तु बाजारामधुन उपलब्ध करून घेऊ शकतो परंतु पाण्यासाठी आपणास निसर्गावरच
अवलंबुन राहावे लागते. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब काटेकोरपणे व
कार्यक्षमरित्या वापरणे गरजेचे असुन शेतीसाठी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करणे
अत्यावश्यक झाले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानापासुन आदिवासी शेतकरी वंचित राहु नये,
असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वीत
संशोधन प्रकल्पातंर्गत पाणी व्यवस्थापन योजनेमार्फत आदिवासी उपयोजनातंर्गत
हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुक्यातील वाई गांवातील निवडक ४७ आदीवासी
शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप करण्यात आले होते. या योजनेतंर्गत शेतकरी
मेळाव्याचे आयोजन दि ३० डिसेंबर रोजी मौजे वाई येथे आयोजीत करण्यात आला होता, या
मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कळमनुरीचे आमदार मा ना डॉ संतोष टारफे, संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कळमनुरी तालुका
कृषि अधिकारी डी बी काळे, आदीवासी प्रकल्प विकास अधिकारी श्री ए यु धाबे, सरपंच कविताताई
दुधाळकर व प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ ए एस कडाळे, श्री अजित मगर, श्री
जटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, यावर्षी पर्जन्यमान कमी असतांना वाई
गावातील आदीवासी शेतक-यांनी सोयाबीन पिकास संरक्षीत पाणी देऊन ब-यापैकी उत्पादन
काढले आहे तसेच रब्बी पिकांना तुषार सिंचनामुळे संरक्षील पाणी देणे शक्य झाले,
हे या योजनेची खरी उपलब्धी आहे. या पध्दतीने आदिवासी शेतक-यांनाही आधुनिक
तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतीमध्ये आर्थिक प्रगती साधता येईल. शासकीय अनुदानातुन
मिळालेल्या निविष्ठांचा वापर कार्यक्षमपणे व योग्य पध्दतीने होतांना दिसत नाही
तथापी वाई गावातील १०० टक्के लाभार्थ्यांनी तुषार संचाचा वापर योग्य पध्दतीने
केल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
आमदार मा ना डॉ संतोष टारफे आपल्या भाषणात विद्यापीठाने
राबविलेल्या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून म्हणाले की, ब-याचवेळा शासकीय योजनांची
माहिती नसल्याने सामान्य नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचतच नाहीत, शेतक-यांनी
अधिक जागरूक राहुन विविध योजनांची माहिती घ्यावी. कोरडवाहु शेती किफायतीशीर होण्यासाठी
सुक्ष्मसिंचन व तुषार सिंचनाशिवाय पर्याय नाही. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
आदिवासी भागात होत आहे हे नक्कीच प्रगतीचे घोतक आहे. आदिवासी शेतक-यासाठी कृषि
विद्यापीठाने राबविलेल्या योजनेप्रमाणे विविध योजना राबविल्यास आदिवासी भागातुन
होणारे शेतक-यांचे स्थलांतर थांबण्यास मदत होऊन गावातच रोजगाराच्या संधी
मिळतील, असे प्रतिपादन त्यांनी केले. संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर म्हणाले
की, कृषि विद्यापीठ, आदिवासी विकास योजना व कृषि विभाग यांच्या सहकार्याने
आदिवासी शेतकरी जीवनात आमुलाग्र बदल होऊ शकतो.
तालुका कृषि अधिकारी डी बी काळे व आदीवासी प्रकल्प विकास
अधिकारी श्री ए यु धाबे यांनी विविध आदिवासी योजनांची माहिती दिली तर वाई गांवचे
ग्रामस्थ नंदकुमार वाईकर, सतीश पाचपुते, हरिभाऊ दुधाळकर, अजित मगर आदींनीही मनोगत
व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ ए एस कडाळे यांनी
केले तर सुत्रसंचालन प्रा पारडकर व आभार प्रदर्शन डॉ के टी जाधव यांनी केले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी वाई ग्रामस्थ व पाणी व्यवस्थापन
योजनेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. सदरिल कार्यक्रमास वाई गांवाच्या
परिसरातील आदिवासी शेतकरी व महीला शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
![]() |
शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना आमदार मा ना डॉ संतोष टारफे |
![]() |
शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर |
![]() |
शेतकरी मेळाव्यात प्रास्ताविक करतांना मुख्य शास्त्रज्ञ डॉ ए एस कडाळे |