Monday, December 22, 2014

अन्नतंत्र पदवीधरांनी ज्ञानाचा उपयोग शेतक-यांच्या शेतमालाच्या मुल्यंवर्धनासाठी करावा......विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

अन्‍नतंत्र महाविद्यालयात आयएसओ-२२०००० व एचएसीसीपी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपात मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, व्‍यासपीठावर प्रा पी एन सत्‍वधर, प्रा संजय इंदाणी, प्रा हेमंत देशपांडे, प्रा आर बी क्षीरसागर आदी
**************************
योग्‍य पाऊसमान असतांना शेतकरी मोठया प्रमाणात शेतीत उत्‍पादन काढीत आहे, शेतकरी आत्‍महत्‍यामागील अनेक कारणांपैकी शेतमालास अपेक्षीत भाव न मिळणे हे असुन शेतीमालाचे मुल्‍यवर्धनासाठी प्रक्रियाउदयोग उभारणे गरजेचे आहे, याकरिता अन्‍नतंत्र पदवीधरांनी कार्य करावे, असे प्रतिपादन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविदयालयात अन्‍नसुरक्षा व्‍यवस्‍थापन प्रणाली अंतर्गत आयएसओ-२२०००० व एचएसीसीपी याबाबतचे पदवी, पदव्‍युत्‍तर आणि आचार्य स्‍नातकांसाठी तीन दिवशीय प्रशिक्षण दिनांक १९ ते २१ डिसेंबर दरम्‍याण आयोजित करण्‍यात आले होते. सदरिल प्रशिक्षणाचा समारोप दि २१ डिसेंबर रोजी झाला, त्‍याप्रसंगी ते अध्‍यक्षस्‍थानावरून बोलत होते. याप्रसंगी अन्‍नतंत्र महाविदयालयाचे प्राचार्य प्रा.पी.एन.सत्‍वधर, विभागप्रमुख प्रा. हेमंत देशपांडे व प्रा. आर. बी. क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.बी.बी. भोसले पुढे म्‍हणाले की, देशातील वाढत्‍या संख्‍येला पुरेसे व पोषक अन्‍न मिळाले पाहिजे, हया अन्‍नसुरक्षेसाठी शेतमालाचे मुल्‍यवर्धन करण्‍याची गरज आहे. सदरिल प्रशिक्षणात अवगत केलेले कौशल्‍य अन्‍न तंत्र पदवीधरांना निश्चितच उपयोगी पडेल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. या प्रशिक्षणाकरीता आंतरराष्‍ट्रीयस्‍तरावरील मान्‍यता प्राप्‍त प्रशिक्षक तथा विषयतज्ञ श्री संजय इंदाणी यांनी अन्‍न प्रक्रिया उदयोगांतर्गत उपभोक्‍त्‍याची अन्‍नसुरक्षेसाठीच्‍या विविध पैलुंवर मार्गदर्शन केले. सदरील समारोपात सहभागी विदयार्थ्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात आले. प्रशिक्षण यशस्‍वीतेसाठी डॉ. अे.आर. सावते, प्रा. आर.बी. क्षिरसागर, प्रा.के.एस. गाडे, प्रा.बी.एम. पाटील, प्रा. इम्राण हाश्‍मी आदींनी परिश्रम घेतले.