Friday, October 16, 2015

वनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांचे वसतीगृहात दिन 15 ऑक्‍टोबर रोजी डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांच्‍या जन्‍मदिनाचे औजित्‍य साधुन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर प्रमुख वक्‍ते ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राध्‍यापक डॉ शिवा आयथाल, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ के डि नवगीरे, संशोधन उपसंचालक डॉ जी के लोंढे, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ जे पी जगताप, जनसंपर्क अधिकारी डॉ पी एस कापसे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा ए एस कांबळे, प्रा व्‍ही बी जाधव यांची उपस्थिती होती.
  अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले की, वाचन कला ही व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी आवश्‍यक असुन विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन जीवनात वाचन संस्‍कृती जोपासली पाहिजे, त्‍यातुनच व्‍यक्‍तीचे विचार प्रगल्‍भ होतात आणि प्रगल्भ व्‍यक्‍तीमुळेच देशाचा लौकिक वाढतो.
  प्रमुख वक्‍ते प्राध्‍यापक डॉ शिवा आयथाल यांनी वाचन कौशल्‍यावर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, वाचनामुळेच व्‍यक्‍त घडतो, वाचनाचा छंद जोपासणारा व्‍यक्‍ती जीवनात कोणत्‍याही परिस्थितीचा समाना करू शकतो. डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांनी अनेक प्रेरणादायी पुस्‍तके लिहीली, त्‍याचे वाचन करून आपल्‍या व्‍यक्‍तीमत्‍वात सकारात्‍मक बदल विद्यार्थ्‍यांनी करावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
  कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ के डि नवगिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ जी के लोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा व्‍ही बी जाधव यांनी केले. यावेळी डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांच्‍या पुस्‍तकाचे ग्रंथ प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.