Monday, December 15, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची संशोधन केंद्रास भेट. ...

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या परभणी येथील विविध संशोधन केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीत त्यांनी ज्वारी संशोधन केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग (AHDS), गहू संशोधन केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार व विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे उपस्थित होते.

ज्वारी संशोधन केंद्रास भेट देताना माननीय कुलगुरूंनी प्रक्षेत्रावरील पिकांची स्थिती, चालू संशोधन प्रयोग, सुधारित वाणांची कामगिरी तसेच तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत माहिती घेतली. संशोधकांशी संवाद साधत त्यांनी शेतकरी-केंद्रित संशोधनावर अधिक भर देण्याचे निर्देश दिले.

पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात विभागीय उपक्रम, चालू प्रकल्प, पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाबाबत आढावा घेण्यात आला. विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आवश्यक त्या सूचना माननीय कुलगुरूंनी दिल्या.

गहू संशोधन केंद्राच्या पाहणीदरम्यान पिकांची वाढ, रोग व किडींची स्थिती तसेच उत्पादन वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. संशोधन निष्कर्ष शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या पाहणीदरम्यान विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विलास खर्गखराटे, प्रभारी अधिकारी डॉ. सुनील उमाटे, डॉ. अंबिका मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. दडके, डॉ. रमेश पाटील, डॉ. प्रीतम भुतडा तसेच संशोधन केंद्रांवरील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.