वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय येथे केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग पुरस्कृत महिला व ग्रामीण विकासाकरिता उती संवर्धन या प्रकल्पांतर्गत सुशिक्षित तरुण व विद्याथ्यांसाठी प्रगत उती संवर्धनावर आधारित विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक १६ ते २३
डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. सदरिल प्रशिक्षणात लातुर येथील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले
होता. प्रशिक्षणात लातूर, पुणे व परभणी येथील तज्ञ मंडळीनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमास लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. रमेशचंद्रजी बियाणी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी चाकूर येथील पदव्युत्तर कृषी व्यवसाय व व्यवस्थापण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत पाटील हे होते. मा. श्री. रमेश्चन्द्रजी बियाणी आपल्या भाषणात म्हणाले कि, जैवतंत्रज्ञान हे काळाची गरज बनलेली असुन सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितित उती संवर्धन व जनुकीय परावर्तीत वाण निर्मिती हेच वाढलेल्या लोकसंख्येसाठी पूरक अन्नधान्य तयार करू शकते. या तंत्रज्ञानात मुल्यवर्धीत वेगवेगळ्या पिकांचे वाण निर्मितीचे सामर्थ्य आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. हेमंत पाटील म्हणाले कि, कै. विलासराव देशमुख साहेबांनी या महाविद्यालाच्या रूपाने लातूरमध्ये जैवतंत्रज्ञान विषयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा निर्माण करून भविष्यात कृषी संशोधनासाठी लातूर येथे एक व्यासपीठ तयार केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक डॉ. अमोल देठे यांनी केले. सूत्रसंचालन श्री पांडुरंग जेटनवरे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ राहुल चव्हाण यांनी केले. प्रशिक्षण शिबीर यशस्वीतेसाठी श्री. संदीप काळे, प्रकल्प व्यवस्थापक श्री. पशुपत वसमतकर, शरयू गुरले, सुनील आडे, श्रीकांत पाटील, लक्ष्मी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.