वनामकृवित आयोजीत विशेष व्याख्यान
कार्यक्रमात मा. डॉ. गुरबचन सिंह यांनी केले कृषी पदव्युत्तर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा
वाटा केवळ १४ टक्के असुन देशाची ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या कृषी
क्षेत्रावर अवलंबुन आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी कृषी विकासाशिवाय पर्याय
नाही. कृषी पद्वीधरांनी विविध क्षेत्रात कार्य करतांना शेतक-यांसाठी कार्य करावे,
शेतक-यांची सेवा करण्याची संधी आपणास प्राप्त झाली याबाबत रास्त अभिमान
बाळगावा, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष
तथा भारतीय कृषी विद्या संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. गुरबचन सिंह यांनी केले. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी विद्या विभाग व भारतीय कृषीविद्या संस्था
शाखा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ मे रोजी आयोजीत कार्यक्रमात पदव्युत्तर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि एन गोखले, डॉ. बी. व्ही. आसेवार
यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. गुरबचन सिंह पुढे म्हणाले
की, कृषी पदवीधरांना केंद्र व राज्य शासनात अनेक नौकरीच्या संधीसोबतच बॅकिंग
क्षेत्र, खाजगी कंपन्यातही मोठया संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधर स्वत:चा कृषी
व्यवसाय सुरू करून अनेकांना रोजगारही देऊ शकतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त
केले. याप्रसंगी देशापातळीवरील कृषि शास्त्रज्ञ निवड प्रक्रियाची माहिती देऊन
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात शिक्षण संचालक
डॉ. अशोक ढवण म्हणाले की, कृषी क्षेत्र वैविध्यपूर्ण क्षेत्र असुन विविध
प्रकाराची पीके, पशु आदींवर काम करणा-यां अनेक संशोधन केंद्र व संस्था देशात व
राज्यात कार्यरत आहेत, तेथे काम करण्याची मोठी संधी कृषी पदवीधरांना आहेत. महाराष्ट्रातील
कृषी पदवीधर संवाद कौशल्यात कमी पडतो, त्यामुळे देशापातळीवरील अनेक संधीपासुन तो
वंचीत राहतो.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. डि एन
गोखले यांची भारतीय कृषि विद्या संस्थेच्या सल्लागार मंडळावर सदस्य म्हणुन
निवडी झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. ए. एस. कार्ले
यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मेधा सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे
प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया
संख्येने उपस्थित होते.