Tuesday, May 3, 2016

हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतक-यांना सामुदायिकरित्या प्रयत्न करावे लागतील..... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृविच्‍या हुमणी व्‍यवस्‍थापन जनजागृती मोहिम व फळबाग वाचवा अभियानास प्रारंभ
उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

गत दोन-तीन वर्षापासुन हुमणी किडीचा प्रादुर्भाव मराठवाडा व विदर्भ विभागात मोठया प्रमाणावर झाला असुन या किडीचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या दृष्‍टीने मे व जुन हे दोन महिने अत्‍यंत महत्‍वाचे आहेत. सदरिल किडीचे नियंत्रणाचे उपाय हे वैयक्तिकरित्‍या शेतक-यांनी केल्‍यास प्रभावी ठरणार नसुन शेतक-यांना सामुदायिकरित्‍या प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी केले.
  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व रिलायन्‍स फाऊंडेशन यांचे संयुक्‍त विदयमाने परभणी जिल्‍हयात दिनांक २ ते २७ मे दरम्‍यान हुमणी व्‍यवस्‍थापन जनजागृती मोहिम व फळबाग वाचवा अभियानाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक २ मे रोजी अभियानाच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. कांताराव झरीकर, श्री. सोपानराव अवचार, श्री. प्रतापराव काळे, श्री. विठ्ठलराव जवंजाळ, श्री. पी. जी. शिंदे, श्री. रोहिदास जाधव, श्री. माऊली पारधे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले की, किडीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी योग्‍य माहिती विविध माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत त्‍वरित पोहोचविणे गरजेचे असुन किडीचा संपुर्ण जीवनक्रमाबाबतची माहिती शेतक-यांना द्यावी लागेल. 
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, हुमणी किडीबाबत मराठवाडयातील अनेक शेतकरी अनभिज्ञ असुन ही किड एकदम संपुर्णपणे नियंत्रणात येऊ शकत नाही. हुमणी किड व्‍यवस्‍थापन करतांना मशागतीय पध्‍दतीसह जैविक व रासायनिक पध्‍दतीचा एकात्मिकरित्‍या अवलंब शेतक-यांना करावा लागेल. तसेच दुष्‍काळ परिस्थितही फळबागा वाचविण्‍यासाठी कमी खर्चाच्‍या तंत्रज्ञानाचा प्रसार सदरिल अभियानांतर्गत करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्र‍स्‍तावना कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. यु. एन. आळसे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी व विदयापीठातील विविध महाविदयालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जनजागृती अभियानाची सुरूवात प्रगतशील शेतक-यांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखुन करण्‍यात आली. सदरिल अभियान विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्‍हयात दिनांक २ ते २७ मे दरम्‍यान तर हिंगोली जिल्‍हयात दिनांक १ जुन ते १५ जुन २०१६ दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे.

अभियानाची सुरूवात प्रगतशील शेतक-यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आली