Wednesday, May 4, 2016

दुष्काळस्थितीतही योग्य नियोजन व व्यवस्थापनाच्या आधारे वनामकृवि उत्पादित बहुवार्षीक चारापिकाचे प्रक्षेत्र पशुपालक शेतक-यांना मार्गदर्शक

वनामकृवि उत्पादित बहुवार्षीक चारापिकाच्या विविध जातीचे ठोंबे शेतक-यांसाठी उपलब्ध
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या संकरित गो-पैदास प्रकल्‍पात चारापिके प्रक्षेत्र विकसीत करण्‍यात आले असुन फुले जयवंत, फुले यशवंत, बीएसएच-१०, कोईम्‍बतुर-४, पैरागवत, धारवाड-६ आदी बहुवार्षीक चारापिकांचे दहा एकर प्रक्षेत्रावर लागवड करण्‍यात आली आहे. यामुळे विद्यापीठांतर्गत पशुधनास दुष्‍काळसदृष्‍य परिस्थितीत देखिल वाळलेला चा-यासोबत हिरवाचारा सुध्‍दा मुबलक प्रमाणात उपलब्‍ध झाला आहे. दुष्‍काळस्थितीतही योग्‍य नियोजन व व्‍यवस्‍थापनाच्‍या आधारे विकसित केलेले प्रक्षेत्र पशुपालक शेतक-यांना मार्गदर्शक ठरत असुन शेतक-यांना या बहुवार्षीक चारापिकांचे विविध वाणांची ठोंबे एक रूपया प्रतिनगाने उपलब्‍ध असुन लागवडीसाठी विशेषत: खरिप हंगामासाठी चारापिक ठोंबाचा लाभ शेतक-यांनी घ्‍यावा, असे आवाहन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले आहे. सदरिल प्रक्षेत्रास कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिनांक १ मे रोजीच्‍या भेटी दरम्‍यान चारापिकांविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करून चारापिके ठोंबे मोठया प्रमाणात शेतक-यांना पुरवठा करण्‍यासंदर्भात संबधित वि़द्यापीठ अधिका-यांना सुचना दिल्‍या. सदरिल प्रक्षेत्रास परिवहन मंत्री तथा परभणी जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. श्री. दिवाकररावजी रावते, खासदार मा. श्री. संजय जाधव, आमदार मा. डॉ. राहुल पाटील, जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल आदींनी भेट देऊन सदरिल कार्याबाबत विद्यापीठाचे अभिनंदन केले. सदरिल प्रकल्‍प संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. दिनेश सिंह चौहान व त्‍यांचे सहकारी राबवित आहेत.