शासनकर्ता हा समाजाचा शोषणकर्ता होऊ नये. समाजाचे अनेक
प्रश्न आहेत, परंतु प्रशासनाने भारतरत्न डॉ बाबासाहेबांनी तयार केलेल्या
संविधानाशी प्रामाणिक राहुन प्रशासन केले तर अनेक प्रश्न सुटू शकतात. प्रशासकिय
सेवेतील व्यक्तींनी संविधानाप्रमाणाने लोकांची सेवा करावी. लोकशाही टिकविणे ही
नागरिकांची जबाबदारी आहे. संविधानाच्या तत्वाचा नागरिकांना समज होणे गरजेचे आहे,
असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी मा. ई. झेड. खोब्रागडे (भाप्रसे) यांनी केले. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त
दिनांक २१ ऑक्टोबर रोजी आयोजित व्याख्यान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु हे होते तर
व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर,
प्रभारी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले,
महासंघाचे अध्यक्ष डॉ गजेंद्र लोंढे, मुख्य सचिव प्रा ए एम कांबळे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
माजी सनदी अधिकारी मा. ई. झेड. खोब्रागडे (भाप्रसे) पुढे म्हणाले की,
देशातील विविध कायदांचा स्त्रोत हे संविधानच आहे. संविधानाची प्रास्तावना हे
संविधानाचा आरसा असुन संविधान हे राष्ट्रग्रंथ आहे. देशात अनेक विविधता आहेत,
पर्यंत संविधानामुळेच देश एकसंघ आहे. देश महासत्ता होण्यासाठी आपणास
बाबासाहेबांचे विचार घेऊन वाटचाल करावी लागेल. देशात आजही अस्तित्वात असलेली
वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था तोडावी लागेल. लोकशाही यशस्वी होण्यासाठी विविध
जाती व समाजात संवाद होणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
म्हणाले की, भारतात स्थिर प्रशासन हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे असुन
इतर देश आपल्या देशाचा आदर करतात. सर्वांना समान न्याय संविधानामुळे प्राप्त
झाला असुन डॉ बाबासाहेबांच्या विचारापासुन आपण प्रेरणा घेतली पाहिजे.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख व्यक्तांचा
परीचय डॉ व्ही जी टाकणखार यांनी करून दिला तर प्रास्ताविकात डॉ गजेंद्र लोंढे
यांनी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ निता गायकवाड व डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा
ए एम कांबळे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक
वर्ग व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कास्ट्राईब
कर्मचारी महासंघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.