बदलत्या
हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन
शेती
क्षेत्र हे बदलत्या हवामानास जास्त संवेदनशील असुन आशिया खंडातील विकसनशील
देशातील शेतीवर मोठा परिमाण होत आहे. हवामान बदलात तापमान वाढ व पर्यज्यमानातील तफावत हे मुख्य बाबी असुन याचा त्वरित प्रभाव विविध पिकांतील उत्पादनावर
होत आहे. बदलत्या हवामानास अनुकूल विद्यापीठ विकसित कृषि
तंत्रज्ञानाचा प्रसार शेतक-यांमध्ये करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू
मा. डॉ. बी व्यंकटेश्वरलु यांनी केले. नवी दिल्ली येथील ऊर्जा व साधनसंपत्ती
संशोधन संस्था, महाराष्ट्र कृषि स्पर्धात्मकता प्रकल्प व वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी यांचे संयुक्त विद्यमाने बदलत्या हवामानास अनूकुल कृषि तंत्रज्ञान
प्रकल्पाच्या वतीने आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटनाप्रसंगी (दि. 6 मार्च) ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण
संचालक डॉ विलास पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, प्राचार्य डॉ डि
एन गोखले, प्राचार्य डॉ डि बी देवसरकर, डेरीच्या शास्त्रज्ञ डॉ अपर्णा गजभीय
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू
मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे पिकांवरील किड
व रोगांचा प्रादुर्भाव कमी वेळातच वाढत असुन त्यावर नियंत्रण मिळविणे अवघड जात आहे.
हवामान बदलाचा शेती पुरक व्यवसाय जसे दुध उत्पादन व कूकुटपालनावरही प्रभाव होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात
विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले व डॉ अपर्णा गजभीय यांनीही मनोगत व्यक्त
केले. प्रास्ताविकात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी प्रकल्पाची माहिती दिली.
सुत्रसंचालन डॉ जी ए भालेराव यांनी केले तर आभार शुशांत यांनी मानले. दोन दिवसीय कार्यशाळेत
बदलत्या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाबाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन यात
मराठवाडयातील आत्माचे कृषि अधिकारी सहभागी झाले आहेत. उदघाटन कार्यक्रमास विद्यापीठातील
अधिकारी, कर्मचारी व शास्त्रज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते.