Wednesday, March 28, 2018

विद्यार्थ्यांनी स्वत:तील कमतरता ओळखुन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत.....नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद

वनामकृवितील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन 

स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना, मनात दृढ निश्चिय असला पाहिजे. विद्यार्थ्‍यांना स्‍वत: तील सामर्थ्‍य व कमतरतेची जाणीव असली पाहिजे. स्‍वत:तील कमतरता ओळखुन त्‍यावर मात करण्‍यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्‍न करावेत, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 28 मार्च रोजी स्‍पर्धा परिक्षा व व्‍यक्‍तीमत्‍व विकास याविषयावर आयोजित व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर परभणी जिल्‍हा पोलिस अधिक्षक डॉ दिलीप झळके, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री संदिप घुगे, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे सहअध्‍यक्ष डॉ एच व्‍ही काळपांडे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा. श्री. चिरंजीव प्रसाद पुढे म्‍हणाले की, उपलब्‍ध संसाधनांचा योग्‍य वापर व दुरदृष्‍टी ही दोन गुण असलेली व्‍यक्‍ती चांगले नेतृत्‍व करू शकत. डॉ. ए पी जी अब्‍दुल कलाम, डॉ. स्वामीनाथन, डॉ वर्गीस कुरियन आदी शास्‍त्रज्ञामध्‍ये नेतृत्‍व गुण होती, या महान व्‍यक्‍तींच्‍या कार्यांनी व विचारांनी समाजातील अनेक व्‍यक्‍तींचे जीवन प्रभावीत झाले. विद्यार्थ्‍यांनी जाणीवपुवर्क स्‍वत:तील संवाद कौशल्‍य व लिखाण कौशल्‍य विकसित करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.   
तुळजापुर येथील सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री संदिप घुगे आपल्‍या मार्गदर्शनांत म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना वेळेचे नियोजन करणे गरजेचे असुन आपली दिनचर्या निश्चित केली पाहिजे, वायफळ बाबींवर वेळ खर्च करू नये. महाविद्यालयीन जीवनात कोणत्‍याही कायद्याच्‍या कचाटयात अडकु नये, याची दक्षता विद्यार्थ्‍यांनी घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.  
कार्यक्रमात विद्यार्थ्‍यी विचारलेल्‍या स्‍पर्धेपरिक्षेबाबतच्‍या अनेक शंका व प्रश्‍नांना मान्‍यवरांनी उत्‍तरे देऊन समाधान केले. विद्यापीठातील राष्‍ट्रीय छात्रसेनेतील छात्रसैनिक राहिलेले व आज उच्‍चपदावर पोलिस अधिकारी म्‍हणुन कार्यरत असलेले पंडित रेजितवाड, देविदास मुपडे, रामदास निर्दोडे, शशिकांत शेळके, अण्‍णासाहेब पवार आदींचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.
प्रास्‍ताविक शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा एस व्‍ही कल्‍याणकर, डॉ मीना वानखडे, कैलास भाकड, सतिश सुरासे, विजय रेड्डी, सिताराम पवार, अजित पाटील, पुजा मकासरे, मानकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.