Sunday, April 1, 2018

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी शेतक-यांनी शेतातील कपाशीच्‍या प-हाटी तात्‍काळ काढाव्‍यात.....आमदार मा. डॉ राहुल पाटील

मौजे जलालपुर येथे आयोजित प्रात्‍याक्षिक कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव नाईक  मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग आणि कृषि विभाग (राज्य शासन) यांच्या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 31 मार्च रोजी मौजे जलालपूर (ता. जि परभणी) येथे येत्‍या हंगामा कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी पऱ्हाटी नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिकार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन परभणीचे आमदार मा. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी. आर. शिंदे, सीड असोशियनचे डॉ. एस. डी. वानखेडे, तालूका कृषि अधिेकारी श्री. बनसवडे, जलालपूरचे सरपंच संतोबा पुंजारे, संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. जलालपुर येथील शेतकरी अरु टेकाळे यांच्या शेतात कपाशीची श्रेडर यंत्राव्दारे पऱ्हाटीचा चुरा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
मार्गदर्शन करतांना आमदार मा. डॉ राहुल पाटील यांनी शेतकरी बांधवानी शेतातील कपाशीच्‍या पऱ्हाटी तात्काळ काढूण टाकण्याचे आवाहन केले. तसेच नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन येत्‍या हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आतापासूनच काळजी घेण्‍याचा सल्‍ला दिला. विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत करण्यासाठी कपाशी पऱ्हाटी नष्ट करण्‍याची गरजेचे असल्‍याचे नमुद केले. कृषि अधिकारी श्री. बनकर यांनी सुत्रसंचालन केले. प्रात्यक्षिक कार्यक्रमास परीसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.