Monday, September 10, 2018

रायपुर येथे पशुधन लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प येथे कार्यरत असलेले परभणी कृषि महाविद्यालयाचे ग्रामीण कृषि कार्यानुभवातील कृषिदुत आणि पशुधन विकास अधिकारी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने रायपुर येथे नुकतचे (३० ऑगस्ट) जनावरांची आरोग्य तपासणी, लसीकरण कार्यक्रम घेण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके हे होते तर सरपंच दत्ताबुवा गिरी महाराज, पशुधन विकास अधिकारी डॉ सोळंके, कार्यक्रमाधिकारी डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विषय विशेषतज्ञ डॉ बैनवाड उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ उद्य खोडके यांनी शेतीस पशुपालन व दुध उत्पादनाची जोड देण्‍याचा सल्‍ला देऊन शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांचा फायदा करून घ्यावा असे सुचविले. डॉ. सोळंके यांनी जनावरांचे आरोग्य, त्यांच्या वेळोवेळी करावयाच्या तपासण्या व लसीकरण यांचे महत्व सांगितले. डॉ. बैनवाड यांनी गाई, म्हैस व बैल यांच्या विविध जाती, त्यांची वैशिष्ठे आणि जनावरांचे संगोपन व व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. सरपंच दत्ताबुवा गिरी महाराज यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भाग्यवंत यांनी केले. सूत्रसंचालन विनोद ओसावार तर आभार लक्ष्मण कदम यांनी मानले. यावेळी जनावरांना ई-नाम ओळख पत्र देऊन टग लावणे, नकुल कार्ड देणे, गर्भ तपासणी करणे व आजारी जनावरांना औषध उपचार आदीं विविध उपक्रम राबविण्‍यात आले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोविंद मस्के, निखील मुळे, प्रसाद कदम, नारायण लोलमवाड, अनुराग सावंत, संतोष मुंढे, आदिनाथ माळवे आकाश आदींनी परिश्रम घेतले.