Monday, September 17, 2018

शेतक-यांच्‍या समृध्‍दीसाठी शेतकरी, शासन, कृषि विभाग व कृषी विद्यापीठ यांनी समन्‍वयाने कार्य करण्‍याची गरज....कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. खा. अॅड. संजयरावजी धोत्रे

वनामकृवित रबी शेतकरी मेळावा संपन्‍नहवामान बदलामुळे शेती पुढे अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत, शेतीतील उत्‍पादन खर्च वाढत आहे, परंतु त्‍याप्रमाणात उत्‍पादन वाढ होत नसुन, शेतीतील प्रत्‍यक्ष नफा कमी होत आहे. शेतक-यांच्‍या समृध्‍दीसाठी शेतकरी, शासन, कृषि विभाग व कृषी विद्यापीठ यांनी एकत्रित काम करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. खा. अॅड. संजयरावजी धोत्रे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासनयांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेबर रोजी आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक मा. डॉ. लाखन सिंग यांची उपस्थिती होती. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. अजय गव्‍हाणे, मा. श्री. बालाजी देसाई, मा. श्री लिंबाजी भोसले, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा श्रीमती भावनाताई नखाते, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बी आर शिंदे, संशोधन संचालक डॉ डि पी वासकर, शिक्षण संचालक डॉ व्‍ही डि पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा. ना. अॅड. संजयरावजी धोत्रे पुढे म्‍हणाले की, अनेक शेतकरी संशोधक आहेत, आपआपल्‍या परिस्थितीनुसार शेतीतील शेतक-यांचे अनेक प्रयोग यशस्‍वी झाले आहेत. यावर्षी कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत कृषि विभाग व कृषि विद्यापीठांनी मोठी जागृती केली, त्‍यामुळे मोठया प्रमाणात कामगंध सापळे शेतक-यांनी लावल्‍यामुळे सद्यस्थितीत गुलाबील बोंडअळी नियंत्रणात आहे. आपण ब-यापैकी अन्‍नसुरक्षाचे उष्द्दिट साध्‍य करू शकलो, आज गरज आहे, ती पौष्टिक अन्‍न सुरक्षेची. परभणी कृषी विद्यापीठाने लोह व झिंक याचे प्रमाण अधिक असलेले ज्‍वारीचे परभणी शक्‍ती नावाचे वाण निश्चितच उपयुक्‍त आहे. सद्यस्थिती सोयाबिनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. शेतक-यांच्‍या पिक नुकसानीच्या सर्व्‍हेक्षणासाठी रीमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची गरज आहे. शेतक-यापुढे शेतमाल बाजारपेठेचा मोठा प्रश्‍न आहे, यासाठी शेतमाल प्रक्रिया क्षेत्रात काम करण्‍याची गरज असुन फुलशेती, औषधी वनस्‍पती लागवडीस मोठा वाव आहे.

अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर आज शेतीत अनेक समस्‍या निर्माण होत आहेत. एक समस्‍या संपत नाही की, दुसरी नवी समस्‍या शेती पुढे उभी राहत आहे. शेतमाल बाजारपेठाचा मोठा प्रश्‍न असुन एक मजबुत बाजार व्‍यवस्‍था आपणास निर्माण करावी लागेल. तसेच शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन आपण काही प्रमाणात मात करू शकतो. जे विकते तेच पिकविण्‍याची गरज आहे. शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ माहिती तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर करीत असुन प्रसार माध्‍यमांची मोठी साथ विद्यापीठास लाभत आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

मा. डॉ. लाखन सिंग आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने निर्माण केलेले सोयाबिन पिकांचे वाणाचा मोठया प्रमाणात शेतकरी अवलंब करीत असुन शेतकरी त्‍यापासुन चांगले उत्‍पादन घेत आहेत. मराठवाडयातील कोरडवाहु शेतीत सुक्ष्‍मसिचंन पध्‍दतीचा वापर वाढविण्‍याची गरज आहे. हवामान अंदाजात अचुकता आणण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

कार्यक्रमात श्रीमती भावनाताई नखाते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ सुनिता काळे यांनी केले तर आभार विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी मानले. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचे उदघाटन व विद्यापीठ विकसित रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिक व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्‍तिका व घडीपुस्‍तीकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक चर्चासत्रात रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.