Friday, January 25, 2019

महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यींनीनी समाजमाध्‍यमांचा वापर करतांना विशेष काळजी घ्‍यावी.....कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृवित विद्यार्थीनींसाठी डिजीटल शक्‍ती कार्यशाळा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यीनी व महिला कर्मचा-यांसाठी राष्ट्रीय महिला आयोग, सायबर पिस फाऊंडेशन, नवी दिल्ली आणि फेसबूक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 जानेवारी रोजी डिजीटल शक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरु मा. अशोक ढवण यांचे हस्‍ते झाले तर नवी दिल्ली येथील सायबर पीस फांउडेशनचे श्री. अमेय पारटकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. हेमांगीनी सरंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॅा. अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यींनीनी इंटरनेट व डिजीटल गॅजेट वापर करतांना आपल्‍या वैयक्‍तीक माहितीचा दुरूपयोग होऊ शकतो, याचे नेहमी भान ठेवावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यींनी इंटरनेट व समाजमाध्‍यमांचा वापर करतांना विशेष काळजी घेण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
कार्यशाळेत मार्गदर्शक श्री अमेय पारटकर यांनी विद्यार्थीनींना डिजीटल साक्षरता, डिजीटल टेक्नॉलॉजी विषयी काळजी व सुरक्षितता, ऑनलाईन जबाबदारी व वर्तणुक आदींबाबीवर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. हेमांगीनी सरंबेकर यांनी आजच्या युगात डिजीटल साहित्याचा उपयोग व त्यापासून होणारे धोके या विषयी तरुणाईत जागरुकता निर्माण करण्याची आवश्‍यकता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. कार्यशाळेस विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्या.