Monday, January 7, 2019

शेतकऱ्यांचे अनुभव सेंद्रीय शेतीमधील संशोधनासाठी दिशा देणारे......प्राचार्य डॉ. उदय खोडके

वनामकृवित आयोजित नांदेड जिल्‍हयातील शेतक-याकरिताच्‍या सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील आठही जिल्हयांतील शेतक-यांकरिता सेंद्रीय शेतीवर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. याश्रृंखलेमधील नांदेड जिल्हयासाठीच्‍या शेतक-यांसाठी आयोजीत प्रशिक्षण वर्गाचा दि. 5 जानेवारी रोजी समारोप झाला. समारोपच्या अध्यक्षस्थानी कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके हे होते तर एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य कृषि विद्यावेत्ता डॉ. . एस. कारले, पशु-शक्तीचा योग्य वापर योजनाच्‍या प्रभारी अधिकारी डॉ. एस.एन. सोळंके, डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके म्‍हणाले की, शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करत असतांना योग्‍य तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रमाणीकरण आणि बाजारपेठ हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. गटांसाठी प्रमाणीकरण आणि वैयक्तिक प्रमाणीकरण यासाठी वेगळया पध्दतीने पुढे जाता येईल. सेंद्रीय शेतीकडे टप्प्या टप्प्याने वळावे आणि विशेषत: बाजारात मागणीप्रमाणे भाजीपाला फळपिकांसाठी सेंद्रीय शेतीची सुरुवात करावी. सेंद्रीय शेतीसाठी शेतकऱ्यांचे अनुभव यापुढील संशोधन प्रसार कार्यासाठी महत्वाचे ठरते.
डॉ. .एस. कारले आपल्‍या भाषणात म्हणाले की, सेंद्रीय शेती एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब केल्यास खर्च कमी होऊन उत्पादनात स्थिरता आणता येते. यामुळे मानवी जमिनीचे आरोग्य राखण्यास मदत होईल. दुग्ध्व्यवसाय, शेळीपालन, रेशीम उद्योग यापैकी एकाची जोड दिल्यास सेंद्रीय शेती फायदेशीर राहिल. डॉ. एस.एन. सोळंकी आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाल्‍या की, सेंद्रीय शेतीमध्ये बैलचलीत अवजारांचा योग्य वापर केल्यास मजुरांवरील अवलंबीत्व कमी करता येईल यामध्ये आच्छादनासाठी, फवारणीसाठी जिवामृत उपयोगासाठीही अवजारांचा उपयोग करता येईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदिदष्ट आणि सेंद्रीय शेती मधील सद्यस्थिती यावर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजित कदम यांनी केले.
तांत्रिक सत्रात डॉ. व्ही. एस. खंदारे आणि डॉ. आर. डी. बघेले यांनी सेंद्रीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, डॉ. इलियास यांनी जैविक किड व्यवस्थापन, श्री प्रदीप केंद्रेकर यांनी सेंद्रीय शेतीमधील त्यांची यशोगाथा डॉ. एस.एन. सोळंकी यांनी सेंद्रीय शेतीमध्ये अवजारांचा सुयोग्य कार्यक्षम वापर डॉ. एस.एस. धुरगुडे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी किटकांचा उपयोग महत्व, डॉ. सय्यद इस्माईल यांनी जैविक खत निर्मिती वापर तसेच डॉ. के.टी. आपेट यांनी जैविक बुरशी संवर्धनाची निर्मिती उपयोग आणि कु. एस.बी. उफाडे सेंद्रीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास भेट देवुन प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा नांदेड जिल्हयातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होत, कार्यक्रमात शेतकरी माधव आंबेकर, विठठल गाढे, रामेश्वर पांचाळ आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदरिल सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडयातील आठही जिल्हयांसाठी करण्यात आलेले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनिल जावळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर आदींनी परिश्रम घेतले.