Saturday, April 13, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समानतेचा हक्‍क मिळवुन दिला......डॉ प्रकाश हसनाळकर

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती महोत्‍सवानिमित्‍त आयोजीत व्‍याख्‍यानात प्रतिपादन
इतिहासापासुन आपण धडा घेतला पाहिजे महापुरूषाच्‍या केवळ जयंती महोत्‍सव साजरी करून न थांबता, त्‍यांच्‍या विचारांचा आपल्‍या जीवनात अवलंब केला पाहिजे. भारतीय संविधानाची निर्मिती करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, स्‍वांतत्र्याचा सर्वांना समान हक्‍क प्राप्‍त करून दिला, असे प्रतिपादन पुणे येथील पशुसंवर्धन विभागाचे विभागीय उपायुक्‍त डॉ प्रकाश हसनाळकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 128 व्‍या जयंती निमित्‍त दिनांक 13 एप्रिल रोजी आयोजित व्‍याख्‍यानाच्‍या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, डॉ डब्‍लु एन नारखेडे, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी राहुल आरकडे, गुलाब इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ प्रकाश हसनाळकर पुढे म्‍हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजास मुख्‍य प्रवाहात आणले, लेखणीने क्रांती घडवुन आणली. आज समाजात मोठे मतपरिवर्तन दिसते ते समाज सुधारकांच्‍या कार्यामुळे, सामाजिक कार्यामुळे अनेक समाज सुधारकांना समाजात गुरूतत्‍व प्राप्‍त झाले, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी जयंती महोत्‍सवानिमित्‍त थोर महापुरूषांनी केलेल्‍या कार्याच्‍या विविध पैलुचा अभ्‍यास विद्यार्थ्‍यीं करावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा संदिप बडगुजर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.