Friday, April 26, 2019

बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञान प्रसारावर भर देणार.......मा श्री विकासचंद्र रस्‍तोगी (आयएएस)

वनामकृवित पोक्रा प्रकल्‍पांतर्गत कार्यशाळा संपन्‍न
हवामानात बदलाच्‍या परिस्थितीत मृद व जल संवर्धन यावर विशेष लक्ष दयावे लागेल. पोक्रा प्रकल्‍पांतर्गत मराठवाडा व विदर्भातील दुष्‍काळग्रस्‍त गावांत बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पिकांचे प्रसारित वाण व शिफारसीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न करण्‍यात येणार आहेत, असे प्रतिपादन हवामान अनुकूल कृषि प्रकल्‍पांचे प्रकल्‍प संचालक मा श्री विकासचंद्र रस्‍तोगी (आयएएस) यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात हवामान अनुकूल कृषि प्रकल्‍पांतर्गत (पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्‍प) एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन दिनांक 26 एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ रविंद्र चारी, बारामती येथील राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे संचालक डॉ एन पी सिंग, वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, डॉ पदेकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी एम मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा श्री विकासचंद्र रस्‍तोगी पुढे म्‍हणाले की, कमी पर्जन्‍यमानात रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने पिकांची लागवड केल्‍यास मृद व जल संवर्धन होऊन चांगले उत्‍पादन घेता येते, त्‍यामुळे या तंत्रज्ञानाबाबत विस्‍तार कार्यकर्ते व शेतक-यांना प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. कमी पाण्‍यात फळबाग व्‍यवस्‍थापनाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषि विद्यापीठाकडे उपलब्‍ध असुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. मराठवाडयात व विदर्भात खरिपातील ज्‍वार लागवडीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन खालील क्षेत्र वाढले आहे. परंतु ज्‍वारी हे पिक पाण्‍याचा ताणसहन करणारे असुन मानवास अन्‍न तर जनावरास चारा पुरवणारे असल्‍यामुळे पुन्‍हा खरिप ज्‍वारी खालील क्षेत्र वाढण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न करावे लागतील. बीटी कपाशी एैवजी कपाशीचे सरळ व देशी वाणाची लागवड तज्ञांच्‍या निरिक्षणाखाली केल्‍यास निश्चितच कमी खर्चात शाश्‍वत उत्‍पादन घेता येईल. तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतमालाचे उत्‍पादन वाढविण्‍यात येऊ शकेल परंतु शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढीसाठी योग्‍य बाजारभाव, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, साठवणुक व विपणन व्‍यवस्‍था आदींचे बळकटीकरण करण्‍याची आवश्‍यकता आहे. पोक्रा अंतर्गत गावांत कृषि तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्‍यासाठी शेतीशाळेचेही आयोजन करण्‍यात येणार आहे. प्रकल्‍पांतर्गत निवडलेल्‍या गाव समुहातील प्रत्‍येक गावांचे सुक्ष्‍म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्‍या मान्‍यतेने व ग्राम कृषि संजीवनी समितीव्‍दारे गावामध्‍ये हाती घ्‍यावयाच्‍या उपाययोजनांचा प्राधान्‍यक्रम निश्चित करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
कुलगूरू मा डॉ अशोक ढवण आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञान विद्यापीठाकडे उपलब्‍ध असुन हे तंत्रज्ञान पोक्रा प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ संपुर्णपणे सहकार्य करेल.     
कुलगूरू मा डॉ विलास भाले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, पोक्रा प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन खरिप हंगामात पावसाच्‍या खंडात एका संरक्षित पाण्‍याची सुविधा उपलब्‍ध झाली तरी पिकांचे उत्‍पादन वाढु शकते. मराठवाडा व विदर्भ विभागातील कापुस व सोयाबीन पिकांची लागवड मोठया प्रमाणात होत असुन पिक पध्‍दतीत बदल करावा लागेल. ऊस लागवडीसाठी मोठया प्रमाणात पाण्याची गरज लागते त्‍याऐवजी कमी कालावधीत व कमी पाण्‍यावर येणारे शुगरबीटची लागवड करता येऊ शकते. ठिंबक सिंचन पध्‍दतीवरच संपुर्ण फळबाग लागवड करावी लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. 
कार्यशाळेत डॉ रविंद्र चारी, डॉ एन पी सिंग व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आर एन खंदारे यांनी केले तर आभार पोक्रा प्रकल्‍प उपसंचालक डॉ विजय कोळेकर यांनी मानले. कार्यशाळेत परभणी, अकोल व राहुरी येथील कृषि विद्यापीठातील तसेच राष्‍ट्रीय व राज्‍यस्‍तरीय विविध कृषि संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे, मुंबई येथील आयआयटी, कृषि विभागातील तज्ञ, शास्‍त्रज्ञ व अधिकारी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.
हवामान अनुकूल कृषि प्रकल्‍पांतर्गत (पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्‍प) विदर्भ व मराठवाडयातील दुष्‍काळग्रस्‍त गावांमध्‍ये जागतिक बॅकेच्‍या अर्थसहाय्याने राज्‍यात सद्या 5142 गावांत राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पांतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित व शिफारसीत हवामान अनुकुल कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार राज्‍याच्‍या कृषि विभागाच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार आहे.
मा श्री विकासचंद्र रस्‍तोगी मार्गदर्शन करतांना 
मार्गदर्शन करतांना कुलगूरू मा डॉ अशोक ढवण
मार्गदर्शन करतांना कुलगूरू मा डॉ विलास भाले