Tuesday, April 30, 2019

शासकीय सेवेत काम करतांना अनुभवाची शिदोरी महत्वाची असते......शिक्षण संचालक डॉ विलास पाटील

शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषी) डॉ विलास पाटील सेवानिवृत्‍त

कोणत्‍याही संस्‍थेच्‍या प्रगतीसाठी सर्वाच्‍या सहकार्याची गरज असते, संस्‍थेसाठी संपुर्ण समर्पण भावनेने कार्य केले पाहिजे. शासकीय सेवेत काम करतांना अनुभवाची शिदोरी महत्वाची असते, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ विलास पाटील दिनांक 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्‍त झाले, त्‍यानिमित्‍त विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांच्‍या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर श्रीमती उषाताई अशोक ढवण, डॉ आशाताई विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव श्री रणजित पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ विलास पाटील पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येकांनी आपल्‍या कामावर प्रेम केले पाहिजे, कामातच तुम्‍हाला आनंद व समाधान मिळेल. सर्वांच्‍या सहकार्यामुळे शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रात एक चांगले योगदान देऊ शकल्‍याची भावना त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांनी डॉ विलास पाटील यांनी विद्यापीठातील शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रात दिलेल्‍या योगदानाबाबत गौरव करून म्‍हणाले की, डॉ पाटील यांनी संशोधनात नवनवीन विषय हाताळले. विद्यापीठास अधिस्‍वीकृती मिळविण्‍यात डॉ पाटील यांचे मोठे योगदान असुन गोळेगांव कृषि महाविद्यालयाची पायाभरणीत त्‍यांचा मोठा हातभार आहे. विद्यापीठाच्‍या शिक्षण क्षेत्रास एक विशिष्‍ट दिशा त्‍यांच्‍या कार्यकाळात प्राप्‍त झाली, असे गौरवोदगार त्‍यांनी काढले.
कार्यक्रमात डॉ पाटील यांचा विद्यापीठाच्‍या वतीने सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी डॉ विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली तयार करण्‍यात आलेल्‍या कृषि शिक्षणाची पुढील दिशा यावर आधारीत व्‍हीजन 2025 चा अहवाल माननीय कुलगूरूंना सुपूर्त करण्‍यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ रणजित चव्‍हाण यांनी मानले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी आदीच्‍या विविध संघटनेच्‍या वतीने डॉ विलास पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला.