Monday, January 11, 2021

शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावरील विद्यापीठ विकसित तुरीच्‍या वाणास मोठा बहर

भोकर तालुक्‍यातील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्र विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी. बी देवसरकर यांची भेट व मार्गदर्शन  

दिनांक ११ जानेवारी रोजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी. बी देवसरकर, कृषि विद्यावेत्ता डॉ यु. एन. आळसे यांनी नांदेड जिल्‍हयातील मौजे नारवट (ता. भोकर) येथील प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मीकांत देशपांडे यांचे तूर पिकाची पहाणी केली. श्री देशपांडे यांनी दहा एकर क्षेत्रावर विद्यापीठ विकसित बीएसएमआर ७३६ या तुरीच्‍या वाणाची टोकण पद्धतीने १०X१.५ फुट अंतरावर लागवड केली असुन सद्यस्थितीत मोठया प्रमाणात शेंगा लगडलेल्‍या दिसुन येत आहे. एकरी ९ ते १ क्विंटल उत्पादन येण्याची अंदाज असुन श्री देशपांडे एकात्मिक पध्दतीने अन्‍नद्रव्य व एकात्मिक किड रोग व्यवस्थापनाचा अवलंबत केला आहे. यात विद्यापीठ निर्मिती बॉयोमिक्‍सचा वापर केला असल्‍यामुळे तुरीवर अत्यंत कमी प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

यावेळी डॉ डी. बी देवसरकर यांनी घरच्या घरी तुरीचे शुध्‍द बियाणे निर्मितीबाबत मार्गदर्शन करून सदरिल  बीएसएमआर ७३६ या वाणाचे शुध्द बियाणे तयार करून इतर शेतकऱ्यांना शुद्ध व दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्‍याचा सल्‍ला दिला. यावेळी भोकर तालुक्‍यातील मौ. रायखोड येथे श्री नार्लेवाड यांचे भोकर तालुक्यातील नाविन्यपूर्ण अशा बटाटा शेती, मौजे भोकर येथे श्री भगवान किशनराव कदम यांचे पेरू व पपई बागेस भेट दिली. भेटी दरम्यान डॉ  यु. एन आळसे यांनी अन्‍नद्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र भेटी दरम्यान तालुका कृषि अधिकारी श्री व्ही. बी. गिते भोकर, मंडळ कृषि अधिकारी श्री रामहरी मिसाळ भोकर, तालुका तंत्र व्यवस्थापक श्री बोईनवाड़ श्री विशाल बोथींगे शंतणू सितावर आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.