Sunday, January 3, 2021

शेतकरी कुटुंबाच्‍या आर्थिक समृध्‍दी करिता शेतीच्‍या सातबारावर महिलांचे नाव पाहिजे ...... मा. श्रीमती आशाताई भिसे

वनामकृवि तर्फे आयोजित ऑनलाईन महिला मेळाव्‍यात प्रतिपादन

क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या कार्यामुळेच महिला शिक्षणाचे अखंड कार्य चालु आहे. शेतीतील ८० टक्के शेतकामात महिलांचा प्रत्‍यक्ष सहभाग असतो, पेरणी, खते देणे, कोळपणी, काढणी आदी काबाडकष्‍टाच्‍या कामात सहभाग असतो, परंतु शेतमाल विपणन प्रक्रिया व आर्थिक बाबीतं महिलांचा सहभाग नसतो. प्रत्‍येक काम महिला बारकाईने व नियोजनबध्‍द पध्‍दतीने करतात, काटकसर हा अंगभुत गुण महिलांमध्‍ये असतो, त्‍यामुळे महिलाचा शेतमाल विक्री, विपणन व निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविल्‍यास निश्चितच शेतकरी कुटंबाची आर्थिक समृध्‍दीत वाढ होईल. निर्णय प्रक्रियेत महिला सहभाग वाढविण्‍याकरिता सात बारावर महिलांचे नाव असले पाहिजे, अशी अपेक्षा लातुर येथील उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्‍या मा. श्रीमती आशाताई भिसे यांनी व्‍यक्‍त केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व सामुदायिक विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त दिनांक ३ जानेवारी रोजी आयोजित ऑनलाईन महिला शेतकरी मेळाव्‍यात प्रमुख अतिथी म्‍हणुन मार्गदर्शन करतांना त्‍या बोलत होत्‍या. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्या डॉ जयश्री झेंड, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा. श्रीमती आशाताई भिसे पुढे म्‍हणाल्‍या की, बचत गट चळवळीमुळे महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढत आहे, आज महिला बचत गटामुळे महिलाही कुटुंबाच्‍या आर्थिक आधार देत आहेत. राज्‍यात शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याचे जाळे निर्माण होत आहे, परंतु शेतीतील कामात मोठा स‍हभाग असणा-या महिलांचाही उत्‍पादक कंपन्‍या स्‍थापन झाल्‍या पाहिजे. शेतमाल आधारभुत किंमत ठरवितांना महिलांचे शेतकामातील कष्‍टाचे मोलाची नोंद  घेतली पाहिजे. महिलाच्‍या कामाचे मुल्‍यांकन व्‍हावे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, गेल्‍या नऊ महिन्‍यात विद्यापीठाच्‍या वतीने अनेक कार्यशाळा, मेळावे, चर्चासत्र आदींचे ऑनलाईन आयोजन करण्‍यात आले, त्‍यास शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला. कोरोना महामारीतही कृषि विद्यापीठाचे विस्‍ताराचे कार्य अविरत चालु आहे. आज प्रत्‍येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. शेतीतील काबाडकष्‍टाची कामे महिलाच करतात. शेतकरी महिला केंद्रीत कृषि विद्यापीठाचे संशोधन कार्यात भर देण्‍यात येत आहे. विद्यापीठातील सामुदायिक महविद्यालय, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी म‍हाविद्यालय आदी महिलासाठी कार्य करित आहेत. ग्रामीण भागात घराघरात उन्‍नती  करण्‍याकरिता महिला सक्षमीकरण करावे लागेल. शेतमाल उत्‍पादन, काढणी, प्रक्रिया ते बाजारपेठ साखळी मजबुत करतांना महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे. लवकर विद्यापीठ मराठवाडयातील यशस्‍वी महिला शेतकरी व उद्योजिका यांची यशोगाथा पुस्‍तक स्‍वरूपात प्रकाशित करणार आहे, त्‍यामुळे इतर महिलांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर म्‍हणाले की, शेतीतील कामे वेळेवर होण्‍यात महिलांचा मोठा वाटा असतो. शेतीतील काबाडकष्‍ट कमी करण्‍याकरिता महिलास उपयुक्‍त अवचारे व लघुउघोगास लागणारे तंत्रज्ञान संशोधनाच्‍या आधारे कृषि विद्यापीठाने निर्माण केले असुन महिला सक्षमीकरणाकरिता विद्यापीठ कार्य करित आहे.

प्रास्‍ताविकात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड यांनी ग्रामीण महिलासाठी उपयुक्‍त तंत्रज्ञान निर्मिती कार्याची माहिती दिली.  कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते शेतीभाती मासिक, विद्यापीठ कृषि दिनदर्क्षिका व कोरोना काळातील विद्यापीठाचे कार्य या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले.

मेळाव्‍यात तांत्रिक सत्रात महिलांचे शेतीतील काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी सुधारीत शेती अवजारे यावर डॉ जयश्री रोडगे, शेतकरी महिलांकरिता विविध व्‍यवसायाच्‍या संधी यावर श्रीमती वर्षा मारवाळीकर, कोरोना काळातील बालकांची घ्‍यावयाची काळजी यावर डॉ जया बंगाळे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार प्रा. मेधा उमरीकर यांनी मानले. ऑनलाईन मेळाव्‍यात मराठवाडयातील शेतकरी महिला व शेतकरी बांधवानी मोठा सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता नाहेप प्रकल्‍प, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, मराठवाडयातील विविध कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग आदींचे सहकार्य लाभेल.