Monday, May 3, 2021

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन उन्हाळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालया अंतर्गत मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागातर्फे दिनांक ७ ते ३० एप्रिल दरम्यान चार ते आठ वर्षे वयोगटातील बालक व त्‍यांच्‍या पालकां करिता ऑनलाइन राज्यस्तरीय उन्हाळी शिबिराचे  करण्‍यात आले होते. या शिबिराचा समारोप दिनांक 30 एप्रिल रोजी संपन्‍न झाला.  

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयश्री झेंड या होत्‍या तर आयोजिका मानव विकास विभाग प्रमुख डॉ. जया बंगाळे व समन्‍वयक सहयोगी प्राध्यापिका डॉ. वीणा भालेराव यांची उपस्थिती होती.

शिबिरास पालकांचा तसेच बालकांचा अगदी भरभरून प्रतिसाद लाभला. संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी कानाकोपऱ्यातून जसे की कोल्हापुर, इचलकरंजी, मुंबई, बुलढाणा, पुणे, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, जालना, परभणी तथा शहरी तसेच ग्रामीण भागातील मुलांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला. 

शिबिरात बालकांसाठी प्रार्थना, चित्रकला, सृजनात्मक कृती, सामान्य ज्ञान, पाककला, विज्ञान अनुभव, शैक्षणिक मनोरंजक खेळ, जीवन कौशल्य विकसन, नाटिका, नैतिक कथा, गंमत कोडी आदी विविधांगी कृती घेण्यात आल्या. पालकांकरिता उत्कृष्ट पालकत्व, कोरोना काळामधील बालसंगोपनतील आव्हाने, वैदिक गणितीय संकल्पना, लेखनाची पूर्वतयारी या विषयांवर  मार्गदर्शन करण्यात आले. शिबिर कालावधीत आलेल्या विशेष दिन जसे की जागतिक आरोग्य दिन, पृथ्वी दिन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचा सर्वांगीण विकास घडविण्या सोबतच अनेक मनोरंजक कृतीद्वारे त्यांना गुंतवून ठेवण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात डॉ. जयश्री झेंड यांनी ऑनलाइन उपस्थित सर्व पालकांचे तसेच त्यांच्या बालकांचे उन्हाळी शिबिरा दरम्यान दर्शविलेल्या उत्साहाबद्दल कौतुक केले. कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितीतही बालविकास घडविण्‍याबाबत तत्‍पर असलेल्‍या पालकांचे अभिनंदन केले. डॉ. जया बंगाळे यांनी पालकांना कुटुंबातील आजी-आजोबांचे महत्व विशद केले तसेच पालकांनी कोरोनाच्या संकट काळात बालकांची  योग्य काळजी घेण्याविषयी आवाहन केले. या प्रसंगी डॉ. वीणा भालेराव यांनी संपूर्ण उन्हाळी शिबिराचा आढावा सादर केला.

शिबिर यशस्वितेसाठी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती श्रुती औंढेकर, श्रीमती वैशाली जोशी, श्रीमती मीना सालगोडे, श्रीमती वर्षा लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराचा जवळपास ९५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. पालकांनी तथा बालकांनी त्यांच्या मनोगताद्वारे कोरोना काळात  शाळा बंद असताना या शिबिराच्या माध्यमातून मुलांना खूप काही नवीन गोष्टी हसत खेळत शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.