Tuesday, May 18, 2021

मराठवाडयातील कृषि विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे पाच दशकात भरीव असे योगदान ..... ज्‍येष्‍ठ कृषि तज्ञ मा श्री विजयअण्‍णा बोराडे

विद्यापीठाच्‍या ४९ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त आयोजित ऑनलाईन खरीप शेतकरी मेळाव्‍यास शेतकरी बांधवाचा मोठा  प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हे सुवर्ण महोत्‍सवी वर्षात पदार्पन करित आहे. गेल्‍या पाच दशकात विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील कृषि विकासात भरीव असे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन जालना येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त तथा ज्‍येष्‍ठ कृषि तज्ञ मा श्री विजयअण्‍णा बोराडे यांनी केले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी विद्यापी ४९ व्‍या वर्धापन दिनी ऑनलाईन खरिप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन आले होते, या मेळाव्‍याचे उदघाटन करतांना ते बोलत होते. ऑनलाईन मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रशांतकुमार पाटील व पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक मा डॉ लाखन सिंग यांची विशेष अतिथी म्‍हणुन उपस्थिती होती. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे आदींचा प्रमुख सहभाग होता.

मा श्री विजयअण्‍णा बोराडे पुढे म्‍हणाले की, मराठवाडयातील सोयाबीन, तुर, ज्‍वारी, मुग, बाजरी आदी मुख्‍य खरीप पिकांची विद्यापीठ विकसित अनेक वाण शेतक-यांमध्‍ये प्र‍चलित झाली आहेत. कपाशी मधील नांदेड ४४ हा वाण बीटी मध्‍ये परावर्तीत केला असुन यांचे मुबलक बियाणे शेतकरी बांधवाना मिळावे. विद्यापीठातील अनेक पदे रिक्‍त असल्‍यामुळे मनुष्‍यबळाची समस्‍या आहेत. परंतु हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर जलत गतीने कृषि संशोधन होणे गरजेचे आहे. बदलत्‍या हवामानास अनुकुल पिकांची वाण, तंत्रज्ञान निर्मिती करावी लागेल. मुख्‍य पिकांना पर्यायी पिकांचा विचार करावा लागेल, यात बाबु, बिब्‍बा, खजुर, जवस आदी सारख्‍या पिकांच्‍या लागवडीवर संशोधनाची गरज आहे. एकात्मिक शेती पध्‍दतीचे मॉडेल तयार करण्‍यात यावे. सेंद्रीय शेती कडे अनेक शेतकरी बांधव वळत आहे, संशोधनाच्‍या आधारे ठोस असे सेंद्रीय तंत्रज्ञान विकसित करावे, जेणे करून सेंद्रीय शेतीबाबत शेतक-यांची फसगत होणार नाही. मराठवाडयात रेशीम उद्योग, सुगंधी व औषधी वनस्‍पती लागवड यास मोठा वाव आहे. डिजिटल माध्‍यमातुन अनेक कृषि विषयक माहिती शेतक-यांपर्यत पोहचत आहे, परंतु माध्‍यमातुन चुकीची माहिती प्रसारीत होऊ नये याचीही काळजी घ्‍यावी लागेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू  मा डॉ प्रशांतकुमार पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ विकसित नांदेड ४४ या कपाशीच्‍या वाणाची लागवड संपुर्ण देशात केली जात होती, अनेक वर्ष या वाणाने शेतक-यांमध्‍ये मोठे अधिराज्‍य गाजवले. सध्‍या विद्यापीठ विकसित सोयाबीन व तुर पिकांची वाणे शेतक-यांमध्‍ये मोठया प्रमाणात प्र‍चलित आहेत. शेतकरी बांधवाना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्‍यात करिता विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी हा नाविण्‍यपुर्ण तंत्रज्ञान विस्‍तार उपक्रम विद्यापीठाचा चांगला उपक्रम आहे.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ येणारे वर्ष स्‍थापनेचा सुवर्ण महोत्‍सवी वर्ष म्‍हणुन साजरा करीत आहे. गेल्‍या पाच दशकाच्या कार्यकाळात कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन नव्‍वद हजार पेक्षा जास्‍त कुशल मनुष्‍यबळ निर्माण केले असुन विविध क्षेत्रात कृषिचे पदवीधर कार्य करून समाज उभारणीत आपआपले योगदान देत आहे. संशोधनाच्‍या माध्‍यमातुन शेतकरी उपयुक्‍त १४४ उन्‍नत वाण विकसित केले असुन ९०० पेक्षा जास्‍त पिक व्‍यवस्‍थापन, पिक संरक्षण, काढणी पश्‍चात हाताळणी व मुल्‍यवर्धन आदीबाबतीत सुधारित तंत्रज्ञान शिफारशी दिल्‍या आहेत तसेच ४६ कृषि यंत्रे व अवजारे विकसित केले आहेत. हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर संशोधनातही बदल करण्‍यात येत आहेत. कृषि संशोधन व कुशल मनुष्‍यबळ निर्मितीकरिता देशातील अनेक अग्रगण्‍य संस्थेशी विद्यापीठाने सामजंस्‍य करार केले आहेत. रासायनिक खतांचा वाढता खर्च पाहाता, खतांची कार्यक्षम वापर करिता प्रयत्‍न करावे लागतील. पिक वाढीकरिता विद्यापीठ निर्मित जैविक उत्‍पादने बायोमिक्‍स, जैविक खते आदीचा शेतकरी बांधव मोठा उपयोग करित आहेत, ही उत्‍पादने पर्यावरण पुरक असुन कमी खर्चिक असल्‍याचे ते म्‍हणाले.

मा डॉ लाखन सिंग आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावातही परभणी कृषि विद्यापीठाचे कार्य अविरत चालु असुन शेतकरी बांधवाच्‍या गरजेनुसार तंत्रज्ञान व मार्गदर्शन विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विविध माध्‍यमातुन करतात. तसेच परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी आपल्‍या मनोगतात खरीप हंगामातील कृषि विभागाच्‍या विविध योजनांचा शेतकरी बांधवांना लाभ घेण्‍याचे आवाहन केले. प्रास्‍ताविकात डॉ डी बी देवसरकर यांनी शेतकरी बांधवानी सोयाबीनचे स्‍वत:च्‍या घरचे बियाणे उगवण क्षमता तपासुन वापरण्‍याचा सल्‍ला दिला.

ऑनलाईन तांत्रिक सत्रात कापुस लागवडीवर डॉ ए जी पंडागळे, सोयाबीन लागवडीवर डॉ एस पी म्‍हेत्रे, कडधान्‍य लागवडीवर डॉ डी के पाटील, खरीप पिकांतील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ पी आर झंवर, खरीप पिकात कृषि यंत्रे व अवजारांचा वापर यावर डॉ स्मिता सोळंकी, हवामान अनुकुल शेती यावर डॉ कैलास डाखोरे आदींनी मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी बांधवाच्‍या कृषि विषयक प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. 

कार्यक्रमात मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील शास्‍त्रज्ञांनी विकसित केलेले महिला शेतक-यांसाठी तंत्रज्ञान या मोबाईल अॅपचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे यांनी मानले. सदरिल मेळावा ऑनलाईन घेण्‍याकरिता तांत्रिक सहाय्य नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. अविनाश काकडे, श्री. रवीकुमार कल्लोजी, इंजि. खेमचंद कापगाते, डॉ. अनिकेत वाईकर आदींनी सहकार्य केले. सदरिल ऑनलाईन मेळाव्‍यास मराठवाडयातील सर्व जिल्‍हातुन शेतकरी बांधवांनी मोठा सहभाग नोंदविला. संपुर्ण कार्यक्रमाचे विद्यापीठाच्‍या युटयुब चॅनेल https://www.youtube.com/user/vnmkv वर उपलब्ध आहे.