वनामकृवितील किटकशास्त्रज्ञाचा
सल्ला
सद्यपरिस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच आंधारीरात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी घाटेअळीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी या अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली आहे. हि कीड बहुभक्षी असून विशेषतः पीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. लहान अळया सुरुवातीला कोवळी पाने, कळया व फुले कुरतडुन खातात. घाटे लागल्यानंतर अळया घाटे कुरतडुन त्यास छिद्र पाडुन डोके आत खुपसुन आतील दाणे खातात. साधारणता: एक अळी तीस ते चाळीस घाटयांचे नुकसान करु शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी अवस्था असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते. असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पी.एस. नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांनी केले आहे.
सद्य परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना
कोळपणी किंवा निंदणी करुन पीक तणविरहित ठेवावे तसेच घाटेअळीच्या मोठया अळया हाताने वेचून त्यांना नष्ट करावे. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासुन १ मिटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळयामध्ये ८ ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी. शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत. यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल. पिकाच्या सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एचएएनपीव्ही ५०० एल ई १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्राम निळ टाकुन सायंकाळी फवारणी करावी. जर कीडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी २.५ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा तसेच घुटका, तंबाखु खाऊ नये व बीडी पिऊ नये.