Sunday, September 17, 2023

कमी पर्जन्‍यमान व जमीनीतील ओलावा यांचा विचार करून रबी पीकांचे नियोजन करावे ...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षा निमित्‍त आयोजित रबी पीक परिसंवादात प्रतिपादन

शेतकरी बांधवांनी हवामान बदलानुसार रबी पिकांचे नियोजन करावे. या वर्षी खरीप हंगामात पाऊसाचे प्रमाण कमी राहीले असुन पडणा-या पावसात खंड पडला, यामुळे खरीप पीकाच्‍या वाढीवर परिणाम झाला आहे. पावसाचे कमी प्रमाण आणि उपलब्‍ध जमीनीतील ओलावा यांचा विचार करून येणा-या रबी पीकांची निवड करावी. परभणी कृषि विद्यापीठ विकसित ज्‍वार, करडई, जवस आदी पिकांच्‍या वापर करावा, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिला. मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने रबी पीक परिसंवादाचे आयोजन दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्‍हणुन नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु आणि मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. नितिन पाटील आणि परभणीचे माजी खासदार मा अॅड सुरेशराव जाधव हे होते. व्‍यासपीठावर संचालक (संशोधन) डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संचालक (शिक्षण) डॉ उदय खोडके, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दौलत चव्‍हाण, श्री किशोर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, विद्यापीठातील करडई, बाजरा आणि गळीत धान्‍य संशोधन केंद्रास उत्‍कृष्‍ट संशोधन केंद्राचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्राप्‍त केला असुन आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठाचा पुरस्‍कार न्‍युयॉर्क येथे प्रदान करण्‍यात आला आहे. शेतकरी कल्‍याणाकरिताचा कृषि विद्यापीठांची स्थापना झाली असुन प्रथम शेतकरी बांधवाची सेवा या भावनेने सर्वांनी कार्य केले पाहिजे. शेतकरी सेवा हिच ईश्‍वर सेवा आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर मर्यादीत करून जैविक खते व जैविक किटकनाशकांचा वापर वाढवावा लागेल. शेतीत अधिक उत्‍पादनापेक्षा शाश्‍वत उत्‍पादनावर भर असला पाहिजे. विद्यापीठ कृषि यांत्रिकीकरण व डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या शेतीत वापर वाढविण्‍याकरिता प्रयत्‍न करित आहे. नुकतेच शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा फवारणी करिता वापराबाबत मार्गदर्शक तत्‍वे निश्चित करण्‍यात आली आहेत. भविष्‍यात ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग शेतीत होणार आहे.  

प्रमुख अतिथी कुलगुरू मा डॉ नितिन पाटील म्‍हणाले की, अनिश्चित पर्जन्‍यमान्‍याच्‍या पार्श्‍वभुमीवर शेतकरी बांधवांनी पिक लागवडी सोबतच कृषि पुरक व्‍यवसाय केला पाहिजे. यात शेळी पालन, बकरी पालन, मत्‍स्य पालन, दुग्‍ध व्‍यवसाय आदीची जोड दिल्‍यास आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त होऊ शकते. राजस्‍थान मध्‍ये अत्‍यंत कमी पाऊस पडतो, परंतु त्‍या ठिकाणी शेतकरी विविध पशु व्‍यवसाय करतात. नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत असलेले राज्‍यातील विविध पशु विज्ञान महाविद्यालयात याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते, त्‍याचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्‍यावा असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

मार्गदर्शनात माजी खासदार मा अॅड सुरेशराव जाधव म्‍हणाले की, शेतकरी बांधवाच्‍या गरजचा व हवामान बदल यांचा विचार करून विद्यापीठाने संशोधन करावे. अचुक हवामान अंदाज करिता अधिकाधिक संशोधन व्‍हावे. शेतकरी सक्षम झाला तरच देश सक्षम होईल. आज आपण विक्रमी अन्‍नधान्‍य निर्मिती करीत आहोत, आज आपणास सकस अन्‍नधान्‍याची गरज आहे. महाराष्‍ट्र शासनाने परभणी कृषि विद्यापीठांतर्गत चार महाविद्यालये आणि एक सोयाबीन संशोधन केंद्राची घोषणा केली असुन यामुळे शेतकरी बांधवा लाभ होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ धर्मराज गोखले विद्यापीठ विकसित विविध पिकांच्‍या वाणांचा शेतकरी बांधवांनी अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. परिसंवादात हवामान बदलानुसार रबी पिकांचे नियोजन, शुन्‍य मशागत व संवर्धीत शेती, शेततळयाचे नियोजन, रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीं विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवाच्‍या कृषि विषयक विविध प्रश्‍नांची उत्‍तरे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी चर्चासत्रात दिली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित रबी पीकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन करण्‍यात आले तसेच विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित घडीपत्रिका व प्रकाशनांचे विमोचन करण्‍यात आले. परिसंवादास शेतकरी बांधव, कृषि अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.