Tuesday, September 5, 2023

सद्यस्थितीतील सोयाबीन पिकावरील किड आणि रोग व्यवस्थापन

सध्या सोयाबीन फुलोरा आणि काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत, अशा अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्रीभुंगा वा खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. शेतातून फिरत असताना सोयाबीनचे एखादे झाड संपूर्ण हिरवे असते परंतु त्याचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेली अथवा वाळलेली दिसून येते. त्या झाडाचे निरीक्षण केल्यास त्यावर दोन गोलाकार म्हणजेच चक्राकार काप केलेले दिसून येतात त्यावरून चक्री भुंग्याचा झालेला प्रादुर्भाव सहजरित्या लक्षात येतो. तसेच शेंगा पोखरणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) आणि केसाळ अळी या पंतगवर्गिय किडींचा प्रादुर्भाव ही दिसून येत आहे.

तसेच मागिल काही वर्षांच्या अनुभवावरून असे लक्षात येते की, सोयाबीन पिकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी सोयाबीनला पावसाचा खंड पडल्याने पाण्याचा ताण बसत आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये पुढील प्रमाणे उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

सोयाबीन वरील किडीकरीता पुढील प्रमाणे फवारणी करावी

क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के (६० मिली) किंवा थायमिथोक्झाम १२.६ अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५ टक्के (पूर्वमिश्रित कीटकनाशक) - ५० मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.९० टक्के - १७० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ टक्के - ८० मिली (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८ टक्के - १०० ते १२० मिली किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के (पूर्वमिश्रित कीटकनाशक) - १४० मिली किंवा असिटामाप्रीड २५ टक्के अधिक बाइफेन्थ्रीन २५ टक्के  - १०० ग्रॅम यापैकी कुठलेही एक कीटकनाशक प्रती एकर याप्रमाणात फवारावे. वरील कीटकनाशक सर्व प्रकारच्या किडी (खोडकीडी आणि पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात म्हणून किडीनुसार वेगळे-वेगळे कीटकनाशक फवारण्याची आवश्यकता नाही. 

पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट,शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाकरीता 

टेब्युकोनॅझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - ५०० ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ टक्के - २५० मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन २० टक्के - १५० ते २०० ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३ टक्के अधिक इपिक्साकोनाझोल ५ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - ३०० मिली प्रति एकर फवारावे.

पिवळ्या मोझॅक रोगाकरिता प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून बांधावर न टाकता नष्ट करावीत आणि रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी किडीचे व्यवस्थापन करावे

पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी  द्यावे तसेच कोरडवाहू सोयाबीनला अवर्षणप्रवण परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:००:४५ खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी करताना पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास कीड व रोगांचे अपेक्षित व्यवस्थापन होत नाही.

वरील कीडनाशके मिसळून फवारणी करणे टाळावे. मिसळून फवारणी केल्यास पिकाला अपाय होऊ शकतो तसेच कीडनाशकांचा अपेक्षित परिणामही दिसून येत नाही त्यामुळे ती आवश्यकतेनुसार वेगळी वेगळी फवारावी. किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षण विषयी काळजी घ्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ.जी.डी.गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी केले असुन अधिक माहितीसाठी ०२४५२-२२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करावा.


चक्रीभुंगा



तंबाखू वरील पाने खाणारी अळी (लष्करी अळी


शेंगा पोखरणारी अळी