Monday, January 1, 2024

वनामकृविचे माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची पत्रकार परिषद संपन्‍न

पत्रकार परिषदेत माननीय कुलगुरू यांनी मांडल्‍या २०२३ वर्षातील वनामकृविच्‍या प्रमुख उपलब्‍धी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी पत्रकार परिषद संपन्‍न झाली. यावेळी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, संचालक बियाणे डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव श्री पी के काळे, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, नियंत्रक श्री प्रविण निर्मळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकार परिषदेस संबोधीत करतांना माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठे २०२३ वर्षातील कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रातील प्रमुख उपलब्‍धी बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. यावेळी प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर सह विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेस परभणी शहरातील प्रसार माध्‍यमाचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी २०२३ वर्षातील प्रमुख उपलब्‍धी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विसावे कुलगुरू म्‍हणुन मा डॉ इन्‍द्र मणि यांनी २५ जुलै २०२३ रोजी पदाची सुत्रे स्‍वीकारली. २०२३ वर्षात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वाखाली कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण या तिन्‍ही क्षेत्रात विद्यापीठाची घोडदौड सुरू आहे. गेल्‍या २०२३ वर्षात विद्यापीठाच्‍या महत्‍वाच्‍या कार्याचा थोडक्‍यात आढावा :

 

चार शासन अनुदानित व दोन संशोधन केंद्रास मान्‍यता : महाराष्‍ट्र शासनाने नुकतेच नवीन चार शासन अनुदानित घटक महाविद्यालये स्‍थापन करण्‍यास मान्‍यता दिली आहे. यात जिरेवाडी (परळी) येथे कृषि महाविद्यालय आणि कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालय, नांदेड येथे कृषि महाविद्यालय तसेच सिल्‍लोड तालुक्‍यात कृषि महाविद्यालयास मान्‍यता प्राप्‍त झाली आहे. यामुळे विद्यापीठाचा कृषि शिक्षणाची संधी विद्यार्थ्‍यांना मिळणार आहे. धर्मापुरी (परळी) येथे सोयाबीन संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र आणि सिल्‍लोड येथे मका संशोधन केंद्रास मान्‍यता मिळाली आहे. 


विद्यापीठ बीजोत्‍पादन वाढीकरिता विशेष  प्रयत्‍न : विविध पिकांच्‍या विद्यापीठ विकसित वाणाच्‍या बियाणास शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहे. विद्यापीठातील मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विभागाकडे स्‍थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्‍यान बीजोत्‍पादन घेतले जात होते, परंतु गेल्‍या काही वर्षापासुन निधी व मनुष्‍यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍या. यावर्षी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याच्‍या उद्देश्‍याने मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. २०२३ वर्षात साधारणत : २००० एकर पडिक जमीन लागवडीखाली आणण्‍यात आली.  येणा-या काळात देखिल साधारणत: १५००-२००० एकर जमीन लागवडी खाली आणण्‍याचे कार्य प्रगतीपथावर आहे. याकरिता विद्यापीठातील विविध प्रकल्‍प व योजनातील ट्रॅक्‍टर्स, आवश्‍यक औजारे, जेसीबी यांचा वापर करण्‍यात आला. तसेच विविध कंपन्‍याचे विविध प्रकाराच्‍या नवीन अठरा ट्रॅक्‍टर्स विद्यापीठाने खरेदी केले आहेत. विद्यापीठाची इंचनइंच जमीन वापराखाली आणण्‍याचा मानस माननीय कुलगुरू यांचा आहे. विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्‍ती करण्‍यात आली आहे, या माध्‍यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता आहे. तसेच नवीन २६ शेततळे प्रस्‍तावित आहेत. यामुळे बीजोत्‍पादनाकरिता संरक्षित सिंचन देणे शक्य होणार आहे. विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर मोठया प्रमाणावर पैदासकार बीजोत्‍पादन करणे शक्‍य होणार आहे.

देश विदेशातील अग्रगण्‍य संस्‍थेसोबत सामंजस्‍य करार : माननीय कुलगुरू यांच्‍या मते शेती आणि शेतकरी यांच्‍या विकासाकरिता शासन, कृषि विद्यापीठे, विविध अशासकीय संस्‍था, सामाजिक संस्‍था, कृषि उद्योग कार्य करित आहेत, यासर्वांनी एकत्रित कार्य केल्‍यास निश्‍चितच शेती व शेतकरी विकासास गती प्राप्‍त होईल. हा दृष्‍टीकोन समोर ठेवुन परभणी कृषी विद्यापीठाने आजपर्यंत गेल्‍या दिड वर्षात २० पेक्षा जास्‍त सामजंस्‍य करार केले. सदर सामंजस्‍य करार नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विद्यापीठात राबविण्‍यास उपयुक्‍त ठरणार आहे. यात जगातील अग्रगण्‍य विद्यापीठे अमेरिकेतील कन्‍सस स्‍टेट युनिवर्सिटी, फ्लोरिडा युनिवर्सिटी यांच्‍या सोबत कृषि शिक्षण व संशोधन करिता करार करण्‍यात आला असुन यामुळे आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील कृषि तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांच्‍यात कौशल्‍य विकास शक्‍य होणार आहे. विविध जागतिक दर्जेाच्‍या संस्‍थेशी सामंजस्‍य करारामुळे विद्यापीठ प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यांना सदर संस्‍थेत प्रशिक्षणे, अभ्‍यास भेटी, तसेच विविध अभ्‍यासक्रम पुर्ण करण्‍यास मदत होणार आहे.

राष्‍ट्रीय उच्‍च कृषि शिक्षण प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन  गेल्‍या वर्षभरात  विद्यापीठातील ५५ पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व २५ प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ जगातील अग्रेगण्‍य विद्यापीठातुन प्रशिक्षण पुर्ण केले, यात अमेरिका, स्‍पेन, हंगेरी, ऑस्‍ट्रोलिया, मलेशिया, ब्राझील, थायलंड आदी १२ देशातील नामांकित कृषि विद्यापीठाचा समावेश आहे, ही विद्यापीठाकरिता एक एतिहासिक बाब होय. या व्‍यतिरिक्‍त देशातील आयआयटी मुंबई, खरगपुर सह अनेक विविध अग्रगण्‍य संशोधन संस्‍थेत डिजिटल तंत्रज्ञानाबाबत ४०० पेक्षा जास्‍त विद्यार्थी व प्राध्‍यापकांना प्रशिक्षण देण्‍यात आले. याचा परिणाम विद्यापीठाच्‍या शैक्षणिक व संशोधन दर्जा सुधारणा होण्‍याकरिता मदत होत आहे. यामुळे विद्यापीठाचे मानांकन उंचावण्‍यास मदत होणार आहे. अमेरिकेतील अनेक शास्‍त्रज्ञांनी परभणी विद्यापीठाच्‍या विविध चर्चासत्रात सहभाग घेतला.

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग यांच्‍याशी संशोधनाकरिता सामंजस्‍य करार करण्‍यात आला असुन या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांच्‍या नाविण्‍यपुर्ण संशोधनाकरिता परभणी कृषि विद्यापीठास ५० लाख रूपयाचा निधी प्राप्‍त झाला आहे. तरूणांकडे नवनवीन संशोधन संकल्‍पना असतातत्‍यास व्‍यासपीठ देण्‍याचा यामागे हेतु आहे. देशातील कृषि यांत्रिकीकरणात अग्रगण्‍य असलेली नोएडा येथील सीएनएच इंडस्ट्रियल इंडिया (न्‍यु हॉलंड) यांच्‍याशी सामंजस्‍य करार करण्‍यात आला असुन “कौशल्य विकास-कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण” प्रकल्‍पांतर्गत कृषी यांत्रिकीकरणात शेतकरी आणि ग्रामीण युवक यांना प्रशिक्षीत करण्‍यात येत आहे. याकरिता व्यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआर) मधुन ५० लाख रूपये मंजुर झाले आहेत. प्रकल्‍पांतर्गत कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र राहणार असुन खामगाव, औरंगाबाद, तुळजापूर आणि जालना येथील कृषी विज्ञान केंद्राचे उपकेंद्राची स्‍थापना करण्‍यात येत आहे. याव्‍दारे १५०० शेतकरीतंत्रज्ञ आणि ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देण्‍यात येणार असुन प्रशिक्षणार्थींना ‘आत्मा निर्भार भारत मिशन’ अंतर्गत त्यांचे स्वत:चे उद्योग / सेवा केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहित करण्‍यात येत आहे. याच प्रमाणे अद्ययावत ट्रक्‍टर आधारित कृषि यांत्रिकीकरणाकरिता टॅफे – जेफार्म सोबत सामंजस्‍य करार करण्‍यात येऊन जेफार्म - यां‍त्रिकीकरण केंद्र (महाराष्‍ट्र) यांची सुरूवात करण्‍यात आली आहे. याव्‍दारे विद्यापीठात आधुनिक वर्क्‍सशॉपच्‍या माध्‍यमातुन शेतकरी व विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देणे शक्‍य होणार आहे. कृषि अभियांत्रिकीकरणातील संशोधनास चालना मिळणार असुन याकरिता टॅफे कंपनी देखिल व्यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआर) मधुन २.५० कोटी रूपयाचा मंजुर केला आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडुन व्‍यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी एवढयाप्रमाणात प्राप्‍त करणारे राज्‍यातील एकमेव विद्यापीठ ठरले असुन माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी ही संकल्‍पना कृषि विद्यापीठात रूचविण्‍याचे कार्य केले आहे. यासारख्‍या उपक्रमास नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.  कृ‍षी क्षेत्रात फोटोव्‍होल्‍टेइक तंत्रज्ञानाच्‍या वापराकरिता वनामकृविचा जर्मनीच्‍या जीआयझेड कंपनीशी सामंजस्‍य करार केला आहे. अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर ऊर्जेतुन वीज निर्मितीसोबत विविध पिकांची लागवड केल्‍यास शेतकरी बांधवाना दुहेरी उत्‍पन्‍न मिळण्‍याचे साधन प्राप्‍त होऊ शकते. हे तंत्रज्ञान भारताकरिता नवीन असुन या तंत्रज्ञानाची मराठवाडयातील पिक पध्‍दतीत कितपत उपयुक्‍त ठरू शकतेयाकरिता संशोधनात परभणी कृषि विद्यापीठाने राज्‍यात पुढाकार घेतला आहे. पंजाब राष्‍ट्रीय बँकेच्‍या शेतकरी कल्‍याण ट्रस्‍ट सोबत सामजंस्‍य करार करण्‍यात येत असुन ट्रस्‍टच्‍या व्‍यावसाईक सामाजिक जबाबदारी निधीच्‍या माध्‍यमातुन छत्रपती संभाजी नगर येथे अद्ययावत मराठवाडा शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्‍यात येणार आहे. यात वर्षभर शेतकरी, ग्रामीण युवक, महिला शेतकरी यांनी आर्थिक सक्षमीकरणाच्‍या दृष्‍टीने विविध प्रकाराचे प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेचे (इस्रोअहमदाबाद;  लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्‍चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्‍था; लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन संस्‍था,  मुंबई येथील केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍था, ग्‍लोबल विकास ट्रस्‍ट, महिको लि., पाणी फाऊंटेशन, रिलायन्‍स फाऊंटेशन, ॲडराईज इंडिया, दुर्गा अॅग्रो वर्क्‍स, मे. अॅक्वॅटीक रेमीडीज् ली. मुंबई आदींशी सामजंस्‍य करार केले गेले आहेत. लवकरच विद्यापीठात ड्रोन स्‍कुलची उभारणी करण्‍यात येणार असुन अधिकृत ड्रोन चालकांना प्रशिक्षण देण्‍याकरिता दूरस्थ पायलट प्रशिक्षण संस्था (RPTO) उभारण्‍यात येणार आहे. यामुळे मराठवाडयात शेतीत क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा विकास होण्‍यास मदत होणार आहे.

 

मराठवाडयातील कृषि विकासाकरिता शासन, कृषि विद्यापीठ, कृषी विभाग, शासकीय संस्‍था, अशासकीय संस्‍था, कृषि क्षेत्रातील खासगी कंपन्‍या आणि शेतकरी बांधव यांनी सर्वांना एकत्रित कार्य करण्‍याची माननीय कुलगुरू यांचा प्रयत्‍न आहे. 


डि‍जिटल शेती व कृषि ड्रोन तंत्रज्ञान विकासाकरिता विद्यापीठाचे विशेष प्रयत्‍न : कृषी क्षेत्रात काटेकोर आणि अचूक पद्धतीने विविध कामे करण्याकरिता ड्रोनचा वापर वाढणार असुन विविध पिकात किड-रोग व्‍यवस्‍थापन, अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, पाणी व्यवस्थापन, शेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलट परवाना आवश्‍यक असुन अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था विद्यापीठात स्‍थापन करण्‍या‍च्‍या दृष्‍टीने विद्यापीठ आणि आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्‍यात करार करण्‍यात आला. सद्यस्थिती विद्यापीठाकडे चांगल्‍या दर्जाची चार ड्रोन उपलब्‍ध असुन ड्रोन प्रात्‍यक्षिके आयोजित करण्‍यात येत आहेत. भाडेतत्‍वावर आधारीत ड्रोन केंद्र (कस्टम हायरिंग सेंटर) स्‍थापन करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवा ड्रोन सुविधेचा लाभ होणार आहे. नाहेप प्रकल्‍प अंतर्गत अनेक डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या सुविधा निर्माण करण्‍यात आल्‍या असुन येणार काळात डिजिटल तंत्रज्ञान विकसित करण्‍याकरिता याचा लाभ होणार आहे. 


माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम : कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता विद्यापीठाव्‍दारे विविध उपक्रम राबविण्‍यात येतातच, परंतु याची व्‍याप्‍ती व गती वाढविण्‍याकरिता प्रयत्‍न केला जात आहे. सप्‍टेंबर २०२२ मध्ये महाराष्‍ट्र शासनाच्‍या मार्गदर्शनानुसार “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रमातंर्गत मराठवाडा विभागातील ३५० पेक्षा जास्त गावात राबविण्‍यात आला, यात विद्यापीठ शास्त्रज्ञाच्या पथकांनी गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांच्या शेती विषयक समस्या समजुन घेतल्या व पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केलेहा उपक्रम भविष्यातही राबवण्यात येणार असून प्रत्‍येक महिन्यात एक दिवस विद्यापीठातील शास्त्रज्ञ व प्राध्यापक सहभागी होणार आहेत. यामुळे शेतकरी बांधवाशी विद्यापीठाची नाळ अधिक मजबूत होण्‍यास मदत होत आहे. उपक्रमांतर्गत माननीय कुलगुरू स्वत: मराठवाडयातील विविध गावात सहभागी होऊन शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करित आहेत.

कापुस पिकातील बीटी सरळ वाणास केंद्रीय वाण निवड समितीची मान्‍यता : विद्यापीठ विकसित तीन अमेरिकन बीटी सरळ वाण व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची केंद्रीय वाण निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी जनुक) तंत्रज्ञानयुक्त वाणांची पैदास करण्याचे कार्य सुरू असुन याद्वारे निर्मीत एनएच १९०१ बीटी (NH 1901), एनएच १९०२ (NH 1902) बीटी व एनएच १९०४ (NH 1904) बीटी ही तीन अमेरीकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीने मध्य भारत (महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशविभागाकरिता प्रसारीत करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग या केंद्राद्वारे निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा वाण देखिल समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे. परभणी कृषि विद्यापीठ विकसित कापुसाच्‍या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव केल्‍यामुळे शेतकरी बांधवाचा बियाणांवर होणारा खर्च कमी होण्‍यास मदत होणार असुन कोरडवाहू लागवडीमध्ये उत्‍पादनात सातत्‍य देणारे वाण आहेत. सार्वजनिक क्षेत्रामध्ये बीटी कापूस सरळ वाण प्रसारीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले असुन बीटी कापूस लागवडीस सुरुवात झाल्यापासून खासगी कंपनीव्‍दारे कापुसाच्‍या संकरीत वाण निर्मितीवरच भर होतो. सरळ वाणांचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये मागील वर्षाच्या लागवडीतून उत्पादीत कपाशीपासून सरकी वेगळी करून तीच सरकी पुढील तीन वर्षांपर्यंत बियाणे म्हणून वापरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी नवीन बियाणे बाजारातून खरेदी करण्याची आवश्‍यकता पडणार नाही आणि पर्यायाने बियाण्यावरील खर्च कमी होईल.

गतवर्षी दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सोयाबीन वाण एमएयुएस-७३१ सह ४२ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता प्राप्‍त झाली.

विविध संशोधन प्रकल्‍प सादर : विद्यापीठाने १५ संशोधन प्रकल्‍प निधी करिता केंद्र शासनाच्‍या राष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधी – एनएएसएफ (NASF) आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग – डिएसटी (DST) कडे सादर केल असुन लवकरच यातील काही प्रकल्‍प विद्यापीठात प्राप्‍त होणार आहे.

विद्यापीठातील अंतर्गत रस्‍त्‍यांची दुरूस्‍तीकरिता निधी मंजुर: परभणी कृषी विद्यापीठातील रस्‍त्‍यांची सद्य:स्थितीत दुरावस्‍थेमुळे शेतकरी बांधवविद्यार्थीनागरीक व विद्यापीठ कर्मचारी यांना अनेक समस्‍यांना तोंड दयावे लागत होते. विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी कुलगुरू पदाचा कार्याभार स्‍वीकारल्‍यानंतर रस्‍त्‍ये दुरूस्‍तीबाबत प्राधान्‍य देण्‍याचे ठरविले. गेल्‍या एक वर्षापासुन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी पाठपुरावा केला. विद्यापीठातील रस्‍ते हे विद्यापीठातील मुलभूत सुविधेचा भाग असुनया रस्‍त्‍यांची दुरूस्‍तीच्‍या कामांना प्रशासकीय मान्‍यता प्रदान करून निधी उपलब्‍ध करून देण्‍याबाबतचा प्रस्‍ताव महाराष्‍ट्र शासनास कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार सादर केला होता. सदर प्रस्‍तावाची महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री देंवेद्रजी फडणवीस, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, आणि कृषिमंत्री मा ना श्री धनंजय मुंढे दखल घेतली. सदर कामाकरिता १४.७५२६ कोटी रूपये निधीस प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली असुन रूपये आठ कोटी एवढे अनुदान वितरीत करण्‍यास शासन मंजुरी देण्‍यात आली आहे.

मुलांचे व मुलींची वसतीगृहाचे नुतनीकरण : विद्यापीठांतर्गत असलेले लातुर, गोळेगाव, परभणी, बदनापुर येथील महाविद्यालयातील मुलांचे आणि मुलींची वसतीगृहाचे दुरूस्‍ती करण्‍यात आली असुन परभणी कृषि महाविद्यालय सभागृह, प्रशासकीय इमारतीतील दोन सभागृहाचे नुतनीकरण करण्‍यात आले आहे.

इन्‍क्‍युबेशन सेंटरची उभारणी : अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्‍ली येथील केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री सुक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत ३.२९ कोटी निधी प्राप्‍त झाला असुन सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इन्‍क्‍युबेशन सेंटरउभारणीचे काम अंतिम टप्‍पात आहे, यामुळे अन्‍न प्रक्रिया उद्योजक शेतकरी बांधवा लाभ होणार आहे. सदर केंद्राचा परिसरातील शेतकरी बांधवनव उद्योजक यांना उपयोग होणार असून गुळ व गुळापासुन विविध पदार्थमसाले प्रक्रिया उद्योगऊसाच्‍या रसापासुनचे विविध पेय पदार्थ आदी उद्योग विकासावर भर देण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले.


सन्‍मान व पुरस्‍कार

विद्यापीठास तीन आयएसओ मानांकने : वनामकृविस आयएसओ ५०००१, आयएसओ १४००१, आयएसओ २१००१ ही मानके प्राप्‍त झाली असुन यामुळे विद्यापीठाची राष्‍ट्रीय - आंतरराष्‍ट्रीय पातळीवर विशेष ओळख प्राप्‍त होणार आहे. आयएसओ ५०००१ हे मानक विद्यापीठातील ऊर्जा विनिमय आणि व्यवस्थापन दर्जेाच्‍या आधारे विद्यापीठास प्राप्‍त झाले आहे. पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल देऊन पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीचे आयएसओ १४००१ हे मानांक मिळाले आहे.  विद्यापीठांतर्गत असलेल्‍या घटक महाविद्यालयांच्या परिसरात ऊर्जा बचत आणि किफायतशीर विद्युत उपकरणे आणि उपकरणे उपलब्धता, उर्जेच्या अपारंपरिक स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहन, विद्यापीठाच्या आर्थिक विकासासाठी ऊर्जा स्त्रोतांची बचत आदीकरिता आयएसओ १४००१ हे मानांक प्राप्‍त झाले आहे.  आयएसओ २१००१ हे आंतरराष्‍ट्रीय मानक शैक्षणिक संस्था व्यवस्थापन प्रणाली करिता प्रदान केले जाते, विद्यापीठ कृषि शिक्षणात करीत असलेल्‍या कार्यास हे मानक प्राप्‍त झाले असुन पदवी, पदव्‍युत्‍तर आणि आचार्य पदवी अभ्‍यासक्रमाची तसेच डिजिटल तंत्रज्ञान प्रशिक्षण याबाबींची दखल घेण्‍यात आली आहे.

 

विद्यापीठास हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ : कृषि विद्यापीठास ग्रीन मेंटर्स संस्‍थेचा प्रतिष्ठित आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ न्‍युयॉर्क ये‍थे आयोजित ७ व्‍या एनवायसी ग्रीन स्कुल कॉन्‍फरन्‍समध्‍ये ७८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशना प्रदान करण्‍यात आला. 


माननीय कुलगुरू यांची कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी फेलो : अमेरिकेतील फ्लोरिड विद्यापीठात मुख्‍यालय असलेल्‍या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय  अकादमी या अग्रगण्‍य  वैज्ञानिक  संस्‍थेचे फेलो  म्‍हणुन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची निवड झाली, जपान मधील क्‍योटो येथे आयोजित विसावी सीआयजीआर जागतिक परिषदेत त्‍यांना फेलो म्‍हणु अकादमीच्‍या वतीने  सन्‍माननित  करण्‍यात  आले, ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे. 


विविध संशोधन केंद्रास पुरस्‍कार : विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्राच्‍या अखिल भारतीय समन्वीत संशोधन (सूर्यफुल) प्रकल्प, करडई संशोधन केद्र, छत्रपती संभाजीनगर येथील बाजरा संशोधन प्रकल्‍पास उत्‍कृष्‍ट संशोधन केंद्र पुरस्‍कार तसेच नुकतेच बदनापुर येथील तुर संशोधन केंद्राला सर्वोत्‍कृष्‍ट मानांकन मिळाले आहे.  

गेल्‍या वर्षातील महत्‍वाचे कार्यशाळा  : छत्रपती संभाजी नगर येथे बारावी राष्‍ट्रीय बियाणे परिषदेचे विद्यापीठाने यशस्‍वी आयोजन केले, यात देशातील बियाणे पैदासकार, तज्ञ, शेतकरी व धोरणकर्ते यांनी सहभाग नोंदविला. तसेच कृषि संशोधनाची दिशा ठरविण्‍याकरिता केंद्र शासनाच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा कार्यशाळा घेण्‍यात आली, यातही देश पातळीवरील तज्ञांनी सहभाग नोदंविला. खरीप व रब्बी हंगामातील परिस्थितीनुसार वेळोवेळी कार्यशाळा घेण्‍यात आल्‍या, यात मराठवाडयातील कृषि विभागातील अधिकारी, विस्‍तार कार्यकर्ते, शासन व शेतकरी सहभागी झाले. परिस्थितीनुसार शेतीत करावयाच्‍या उपाय योजना शेतकरी बांधवापर्यंत पोहविण्‍याकरिता प्रयत्‍न करण्‍यात आला. 

गेल्‍या हंगामात मराठवाडयातील पर्जन्‍यातील खंडामुळे शेतकरी बांधवाचे झालेल्‍या नुकसानीचे मुल्‍यमापन करण्‍याकरिता विद्यापीठातील कृषि हवामान केंद्राची भुमिका महत्‍वाची ठरली.


विद्यार्थ्‍यांचे कला क्षेत्रातील यश : विद्यार्थ्‍यांच्‍या गुणांना वाव देण्‍याकरिता वेळोवेळी सांस्कृतिक व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहे. बंगलोर येथील जैन विद्यापीठात ३६ वा आंतर विद्यापीठ राष्‍ट्रीय युवा महोत्‍सव – जैन उत्‍सव २०२३ स्‍पर्धेत मेंदी कला प्रकारात विद्यापीठांतील लातुर येथील कृषि महाविद्यालयाची विद्यार्थींनी सिध्‍दी देसाई हिने कांस्‍य पदक पटकावले. तर आयसीएआर अॅग्री युनेफेस्‍ट मध्‍ये फाईन ऑर्ट मध्‍ये चॅपियन ट्रॉफी प्राप्‍त केली. एकविसाव्‍या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्‍पर्धेत व्‍हॉलीबॉल मध्‍ये विद्यापीठ संघाने सुवर्ण पदक प्राप्‍त केले.

 

संशोधन क्षेत्रात शेतकरी बांधवाकरिता उपयुक्‍त संशोधन करणे हा प्रमुख उद्देश्‍य विद्यापीठाचा असुन बदलत्‍या हवामानानुसार संशोधनास गती देण्‍याचे कार्य सुरू आहे. सद्यस्थितीत विद्यापीठात मनुष्‍यबळांचा विचार करता पन्‍नास टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असतांना विद्यापीठाचा दर्जा राष्‍ट्रीय पातळीवर उंचावण्‍याचे मोठे आव्‍हान विद्यापीठा समोर आहे. विद्यापीठाचे नामांकन उच्‍चांवण्‍याकरिता दर्जेदार संशोधनाची आवश्‍यकता असुन याकरिता देश पातळीवरील विविध संस्‍थेकडुन निधी प्राप्‍त करण्‍याकरिता यावर्षी मोठया प्रमाणात संशोधन प्रकल्‍प सादर करण्‍यात आले आहेत.