Thursday, January 4, 2024

महिला निरोगी तर देश निरोगी ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात महिला शेतकरी मेळावा संपन्‍न

शेती कामात महिलांचा मोठा वाटा आहे, परंतु महिला आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतात. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलांनी कुटुंबासोबत स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्‍यंत गरजेचे आहे. जर महिला निरोगी झाली तर संपूर्ण घर राहील, घर निरोगी राहिले तर समाज निरोगी होईल आणि समाज निरोगी झाला तर संपूर्ण देश निरोगी होईल, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयांतर्गत असलेले तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, वॉटर ऑरगनाझेशन ट्रस्‍ट आणि स्‍वयंम शिक्षण प्रयोग, धाराशिव यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दिनांक ३ जानेवारी महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि बोलत होते. व्‍यासपीठावर अटारी पुणेचे संचालक डॉ. सुब्रतो रॉय, विभागीय सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कृषी विभागाचे श्री अभिमन्यू काशीद, उस्मानाबाद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी पाटील, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक श्रीमती वर्षा मरवाळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ इन्‍द्र मणि म्हणाले की, कृषि शिक्षणात मुलींच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली असुन त्‍यांच्‍या शारिरीक स्‍वास्‍थ्य चांगले राहण्‍याकरिता विद्यापीठात विशेष लक्ष दिले जात आहे. त्‍यांच्‍या करिता स्‍वंतत्र व्यायाम शाळा करण्‍यात येत आहेत. विविध खेळा व क्रीडा प्रकारात निरनिराळ्या स्तरावर दैदीप्यमान यश मिळवत आहेत. महिलाही समाजाची सर्जक आहे, संपूर्ण जगाची निर्मिती ही स्‍त्रीपासुनच झालेली आहे. आज महिला नोकरी व्यापार आदि क्षेत्रातही महिला देश विदेशात आघाडीवर आहेत. तुळजापूर कृषी विज्ञान केंद्र हे या भागातील महिलांच्या विकासाकरिता कटिबद्ध असून केंद्राच्या पुननिर्माणाचे कार्य विद्यापीठाने हाती घेतले आहे. महिलांचा सक्षमीकरणाकरिता तुळजापुर कृषी विज्ञान केंद्र चांगले कार्य करित आहे. मेळाव्यातील निरनिराळ्या व्याख्यात्यांना महिलांनी ऐकावे त्यातून मिळणारे ज्ञान आत्मसात करावे असे ते म्हणाले. 

विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले मार्गदर्शनात म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने विविध विषयांवर संशोधन करून शिफारशी दिल्या आहेत. शेतीत काबाड कष्ट करणाऱ्या महिलांचे श्रम कमी करून त्यांचे आरोग्य म्हणून उंचावण्यासाठी शिफारशी करण्यात आलेले आहेत. यात मका सोलनी यंत्र ज्यामुळे एक महिला एका तासात २० किलोग्रॅम मका सहज सोलू शकते. भेंडी तोडणी यंत्र आणि कापूस वेचणी करताना महिलांना होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी ‘कापूस वेचणी कोट’ ची  निर्मिती करण्यात आलेली आहे. विद्यापीठ विकसित ज्वारी, बाजरीच्या जाती यात भरपूर जास्त लोहयुक्त असून त्यामुळे महिलांचे रक्तातील लोहचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तुळजापूर कृषी विज्ञान केंद्र चांगले काम करत, विद्यापीठ प्रकाशित मासिक शेतीभातीचे वर्गणीदार होण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

आटारी पुणेचे संचालक डॉ. सुब्रोतो राय म्हणाले की, भारत सरकारचे कृषी मंत्रालय महाराष्ट्र सोबत भारतातील महिलाकरिता भरीव योगदान देत असून लवकरच १२० नवीन कृषी विज्ञान केंद्राची देशात सुरुवात करण्यात येणार आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्याकडून महिलांकरिता कृषी विज्ञान केंद्राच्‍या माध्यमातून शेती व शेती आधारित उद्योगधंद्यांवर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असून त्याचा महिलांनी लाभ घ्यावा. तर श्री साहेबराव दिवेकर म्हणाले, की शासन शेतकरी महिलांकरीता विविध योजनांची अंमलबजावणी करत असून त्यामधून महिलांनी व महिलांच्या गटांनी कृषी विज्ञान केंद्राकडून तांत्रिक ज्ञान मिळवून सदरील योजनांच्या माध्यमातून प्रगती साधावी.

सदरील महिला मेळाव्या दरम्यान जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी महिलांचा कृषी विज्ञान केंद्राकडून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदरील सत्काराला उद्देशून श्रीमती मनीषा गायकवाड, उमा कराड, सारिका बोरगाव यांनी आपले मनोगत व यशोगाथा महिलांसमोर मांडली. मेळाव्याचे सूत्रसंचालन श्रीमती स्वप्नाली झाडे आभार प्रदर्शन डॉ विजयकुमार जाधव तर यशस्वीतेसाठी डॉ भगवान आबाड, डॉ. भैयासाहेब गायकवाड, श्री. जगदेव हिवराळे डॉ नकुलरवाडीकर, श्री. शिवराज रुपनर, श्री. बालाजी कदम, डॉ दर्शना भुजबळ, श्रीमती अपेक्षा कसबे, श्री. रणेर राठोड आदींनी प्रयत्न केलेमेळाव्‍यात तांत्रिक सत्रात विविध विषयावर शास्‍त्रज्ञ व तज्ञांना मार्गदर्शन केले. मेळाव्‍यात मोठया प्रमाणात महिलांचा सहभाग होता.