पावसाच्या मोठ्या खंडामध्येही तग धरणारे वाण विकसित करू ........ कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्मा, कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रागंणात करण्यात आले होते, या मेळावाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक २३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि होते तर विशेष उपस्थिती माननीय जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विस्तार (भारत सरकार) सहसंचालक श्रीपाद खळीकर, कार्यकारी परिषद सदस्य श्री भागवत देवसरकर, प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर, नागपुर येथील विभागीय सेंद्रीय शेती संशोधन केंद्राचे विभागीय संचालक श्री. अजय सिंह राजपूत, श्री. भारत कुमार देवडा, श्री विजय आगरे, माजी कुलगुरू डॉ. के पी गोरे हे होते तर व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संचालक बीजोत्पादन डॉ. देवराव देवसरकर, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, कुलसचिव श्री पि के. काळे, डीआरडीए प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर उपसंचालक डॉ. गजेंद्र लोंढे, समन्वयक डॉ. राजेश कदम, मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठ संशोधनास प्रथम प्राधान्य देते यातूनच शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण शिफारशी आणि तंत्रज्ञान दिले जाते, हे तंत्रज्ञान प्रसारणासाठी पश्चिम विभागीय कृषी महामेळाव्याचे यशस्वी आयोजन करून शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यात यश प्राप्त झाल्याचे मत व्यक्त करून म्हणाले की, तांत्रिक सत्रामध्ये विविध क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील कृषि तज्ञ, प्रगतशील शेतकरी, धोरणकर्ते यांचे मार्गदर्शनाचा लाभ शेतकरी बांधव आणि विद्यार्थ्यांना होईल. मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाच्या दालनातून दोन कम्बाईन हार्वेस्टर सह अनेक शेती व गृह उपयोगी वस्तूंची विक्री झाली तर अनेक दालनधारक उद्योजकांना ऑर्डर्स मिळाल्या, यामुळे सहभागी उद्योजकांना मोठी संधी प्राप्त झाली. माननीय कृषी मंत्री नामदार श्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलेली अपेक्षा पावसाचा मोठा खंड पडला तरी तग धरणारे व शाश्वत उत्पादन देणारे वाण विकसित करण्याचे संशोधन हाती घेण्यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांना सुचित केले. याबरोबरच अपर मुख्य सचिव (कृषी) मा. श्री अनुप कुमार आयएएस, मा. श्री पाशा पटेल, अध्यक्ष, कृषी मूल्य आयोग (म. रा.) मा. खा. प्रा. फौजिया खान, मा. संचालक तथा कुलगुरू डॉ. ए.के. सिंग भारतीय कृषी अनुसंधान परिषद - भाकृसंसं, नवी दिल्ली यांच्याही सूचनांचा आदर करून त्याप्रमाणे कार्य करण्याचे धोरण हे विद्यापीठ आखेल असे नमूद केले.
मार्गदर्शनात जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे म्हणाले की, विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीचा लाभ होत असुन अनेक शेतकरी बांधव आणि दालनधारकांनी सदर प्रदर्शन एक दिवस अधिक वाढण्याची विनंती केली, यातच या मेळाव्याचे यश लक्षात येते. याप्रकारे वेळोवेळी विद्यापीठाने कृषि प्रदर्शन आयोजित करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सहसंचालक, कृषी विस्तार, भारत सरकार श्री श्रीपाद खळीकर म्हणाले की, मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांचा दिल्लीतील विविध कार्यक्रमातील अनुभव आणि त्यांनी हाताळलेले मोठे प्रकल्प या अनुभवाचा लाभ परभणी विद्यापीठाला नक्कीच मिळेल अशी अशा व्यक्त केली. माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर समस्यांचे डोंगर असताना हे विद्यापीठ योग्य दिशेने कार्य करते तसेच शेतकऱ्यांना आदराचे स्थान मिळवून देण्याचेही कार्य करत आहे. शेतकऱ्यांनी काळानुरूप व हवामान बदलानुसार आपली पीक पद्धती बदलण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी मेळाव्या दरम्यान झालेल्या कार्यांचे व सहभागींचे वर्णन करून विद्यापीठ प्रशासनाचे आणि सहभागींचे आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. वनिता घाडगे-देसाई यांनी केले तर आभार मुख्य विस्तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. सदर कृषि मेळाव्यात पश्चिम भारतातील महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दीव-दमन आणि दादर नगर हवेली इत्यादी सहा राज्यातील शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्या, कृषि अधिकारी, कृषि विस्तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. सार्वजनिक संस्था, खासगी कंपन्या, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्या ३०० पेक्षा जास्त दालनाचा समावेश होता, यात पशु प्रदर्शन, कृषि औजारांचे प्रदर्शन, विविध शेती निविष्ठा, बी बियाणे आदींचा समावेश होता. कार्यक्रमास शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्या, कृषि अधिकारी, कृषि विस्तारक, आणि कृषि उद्योजक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याप्रसंगी प्रदर्शनातील विविध दालनांना मिळालेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मेळाव्याच्या सर्व कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी बांधव, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विविध कंपन्याचे दालनधारक, पशुपालक, शास्त्रज्ञ उपस्थित होते.