Sunday, August 30, 2026

‘एलआरआय मराठवाडा पोर्टल’साठी मृदा व भूमी संसाधनांच्या डिजिटल नकाशांकनावर भर

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन; नागपूर येथील ICAR-NBSS&LUP येथे आंतरक्रियात्मक बैठक

प्रस्तावित एलआरआय मराठवाडा पोर्टल’ तसेच त्यासंबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद–राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो (ICAR-NBSS&LUP), नागपूर येथे आज, दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी आंतरक्रियात्मक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी ICAR-NBSS&LUPचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. वासू (मृदा संसाधन अभ्यास विभाग), वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बेणुकांता दास (दूरसंवेदन अनुप्रयोग विभाग), शास्त्रज्ञ डॉ. सुनील बी. एच. (दूरसंवेदन अनुप्रयोग विभाग) तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि रसायनशास्त्र व मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर उपस्थित होते.

प्रस्तावित पोर्टलच्या माध्यमातून मृदा व भूमी संसाधनांशी संबंधित माहितीचे व्यवस्थापन, माहिती धोरण, माहितीची देवाणघेवाण, डेटा सामायिकरण आणि माहितीचे प्रभावी प्रसारण याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन केले.

डिजिटल मृदा नकाशांच्या निर्मितीमुळे मृदा संसाधनांची अचूक व अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या माहितीचा उपयोग भविष्यात अचूक शेती, पिकांचे नियोजन, मृदा व्यवस्थापन आणि शाश्वत कृषि विकासासाठी प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे प्रस्तावित एलआरआय मराठवाडा पोर्टल’ हे मराठवाड्यातील मृदा व भूमी संसाधनांशी संबंधित माहितीच्या प्रभावी वापरासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

या पोर्टलच्या अनुषंगाने दूरसंवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीच्या (Remote Sensing and GIS) माध्यमातून मृदा संसाधनांचे डिजिटल नकाशांकन करण्याचे कार्य सुरू आहे. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कृषि रसायनशास्त्र व मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या मृदाशास्त्र विभागातील पीएच.डी. विद्यार्थी धीरज कदम हे मराठवाडा विभागाचे डिजिटल मृदा नकाशे (Digital Soil Maps) तयार करण्याचे काम करीत आहेत.

या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो (NBSS&LUP) येथे आयोजित औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठाचे कृषि अभियांत्रिकीचे विद्यार्थी ऐश्वर्या एम. ए., गोपाल इंगळे आणि विद्या कचगुंडे सहभागी झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना दूरसंवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल मृदा नकाशे तयार करण्याच्या विविध तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. प्रशिक्षणादरम्यान मृदा सर्वेक्षण, मृदा संसाधनांचे नकाशांकन, दूरसंवेदन तंत्रज्ञान, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) तसेच डिजिटल स्वरूपातील मृदा माहितीचे संकलन व विश्लेषण याबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळत आहे. मराठवाडा विभागातील डिजिटल मृदा नकाशांच्या निर्मितीसाठी या प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार आहे.

या औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील विद्यार्थीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे विविध कृषि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना मृदा सर्वेक्षण, दूरसंवेदन आणि भू-अवकाशीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एकत्रितपणे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे.