Sunday, August 30, 2026

कृषी व जलसंवर्धनातील योगदानाबद्दल माननीय मुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फडणवीस यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची मानद पदवी प्रदान

 


शेती, शाश्वत ग्रामीण विकास, जलसंवर्धन, नवीकरणीय ऊर्जा आणि शेतकरी कल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करण्यात आली.

नागपूर येथील ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी आज दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते या मानद पदवीचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.

शेती क्षेत्राचा विकास, शाश्वत ग्रामीण विकास, जलसंवर्धन, नवीकरणीय ऊर्जा आणि शेतकरी कल्याणासाठी माननीय मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विद्यापीठाच्या वतीने ११ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित २७व्या दीक्षांत समारंभात त्यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आज या पदवीचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.

माननीय मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेती व शेतकरी विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले असून, अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. ‘स्मार्ट प्रोजेक्ट’, ‘पोक्रा’ तसेच महाराष्ट्र कृषी एआय धोरणाच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे ‘महाॲग्री एआय पॉलिसी २०२५–२०२९’ जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

यासोबतच ‘जलयुक्त शिवार अभियान’, शेतीमालाला हमीभाव व बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा आणि सिंचन प्रकल्पांचा विस्तार, जलसंवर्धन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, अन्नप्रक्रिया व मूल्यसाखळी विकास, बाजारपेठ सुधारणा आणि डिजिटल शेती अशा विविध उपक्रमांद्वारे राज्याच्या कृषी व ग्रामीण विकासाला चालना देण्यात आली आहे.

कृषी, जलव्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील या योगदानाची दखल घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित केले.