Friday, June 14, 2013

मराठवाडा विभागासाठी कृषी हवामान सल्‍ला

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये या आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ राहून मध्‍यम ते जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २७.० ते ३३.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २४.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी १२.० ते २३.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्‍य दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९.० ते ८७.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३.० ते ७७.० टक्‍के राहील.

विशेष सुचना या आठवडयात  आकाश पुर्णतः ढगाळ राहून जोरदार स्‍वरूपाचा नैऋत्‍य मौसमी पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.              

कृषी सल्‍ला 
पेरणी योग्‍य पाउस झाला असल्‍यास या आठवडयात सोयाबीनची पेरणी करावी. पेरणीसाठी एम.ए.यु.एस-७१, जे.एस.-३३५, एम.ए.यु.एस-१५८ या पैकी एका वाणाची निवड करावी. पेरणीपुर्वी बियाण्‍यास रायझोबीयम व पी एस बी जैविक खताची प्रक्रिया करावी.

पेरणी योग्‍य पाउस झाला असल्‍यास या आठवडयात बाजरीची पेरणी पुर्ण करावी. पेरणी ४५ x १५ सें.मी.अंतरावर करावी. पेरणी सोबत ४०:२०: २० (नत्र: स्‍फुरद: पालाश) रासायनिक खताची संपूर्ण मात्रा द्यावी. पेरणीसाठी जीएचबी-५५८, सध्‍दा, सबुरी व एएचबी-१६६६ या पैकी एका वाणाची निवड करावी.

मुगाचे लागवडीसाठी मध्‍यम ते भारी जमीनीची निवड करावी. पेरणी योग्‍य पाउस होताच मुगाची पेरणी ३० x १० सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी बीएम-२००२-१, बीएम-२००३-२ तसेच एकेएम-४ व ग्रीनगोल्‍ड या पैकी एका वाणाची निवड करावी. पेरणी पुर्वी बियाण्‍यास रायझोबीयम व पीएसबी जैवीक खताची प्रक्रिया करावी. 

हळद व आले पिकाची लागवड या आठवडयात पूर्ण करावी. हळद लागवडीसाठी सेलम, कृष्‍णा व लोखंडी तर आलेच्‍या माहिम, जानेडोरीओदो, सुरूची किंवा सुप्रभा या पैकी एका वाणाची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणे बावीष्‍टीनच्‍या द्रावणात बुडवूण घ्‍यावे. हळद व आल्‍याची लागवड ६० x ३० सेंमी अंतरावर करावी. लागवडी सोबत १५०:५०: ५० (नत्र: स्‍फुरद: पालाश) रासायनिक खताची मात्रा दयावी.    

केळीची मृगबाग लागवड मध्‍यम ते भारी जमीनीत सद्या करायला हरकत नाही. या करिता ग्रॅडनाईन, अर्धापुरी, बसराई व श्रीमंती या पैकी एका वाणाची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणे बाविष्‍टीनच्‍या चे द्रावणात बुडवून घ्‍यावे. केळीचे पिकास प्रति झाड १६० ग्रॅम स्‍फुरद व २०० ग्रॅम पालाश लागवडीच्‍या वेळी दयावे. तसेच २०० ग्रॅम नत्र लागवडीनंतर तीन समान भाग करून २,३ व ४ महिन्‍याने द्यावे. 

डाळिंबाची लागवड करावयाची असल्‍यास उत्‍तम निचरा होणा-या हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरूपाच्‍या जमीनीची निवड करावी. डाळिंबाची लागवड ६० x ६० x ६० सें.मी. आकाराच्‍या खडयात ५ x ५ मिटर अंतरावर करावी. लागवडी सोबत २० किलो शेणखत व १ किलो सुपर फॉस्‍फॅटचा वापर करावा. लागवडी सोबत प्रति खडा ५० ग्रॅम लींडेन पावडरचा वापर करावा.       

निशिगंध व झेंडूची लावगवड करावी. निशिंगधाच्‍या सिंगल व डबल जातीची निवड करावी. तर झेंडूच्‍या बेंगलोर लोकल, परभणी लोकल, ऑरेंज क्रॅश या जातीची निवड करावी. निशिंगाधाची लागवड २० x २० सें.मी. तर झेंडूची लागवड ४५ x ३० अंतरावर करावी.

पशुधनाच्‍या अरोग्‍यासाठी या आठवडयातच घटसर्प, फ-या, अंत्रविशार व शेळी मेंढी मध्‍ये बुळकांडी (पीपीआर) रोगाचे लसीकरण नजीकच्‍या पशुचिकित्‍सालयातुन करून घ्‍यावे. लसिकरणापुर्वी जंतनाशकाचे औषध पाजावे.

केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषी हवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः १९                                               
दिनांकः १४.०६.२०१३