Tuesday, February 10, 2015

गटशेतीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात अधिक उत्‍पादन देणा-या तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा......कुलसचिव डॉ डि एल जाधव

वनामकृविचा उमेद कार्यक्रमास माळसोन्‍ना येथे मोठा प्रतिसाद
मौजे माळसोन्‍ना येथील उमेद उपक्रमाच्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ डि एल जाधव, व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, सरपंच मधुकरराव लाड, प्रल्‍हाद लाड, डॉ राकेश आहीरे, आर एन शिंदे आदी
मौजे मालसोन्‍ना येथील उमेद उपक्रमाच्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले
परभणी : नैसर्गिक कारणासह शेतीतील वाढता खर्च व शेतमालाला कमी बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असुन गटशेतीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात अधिक उत्‍पादन देण्‍यारे तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डि एल जाधव यांनी केले.
मराठवाडयात कमी पर्जन्‍यमानामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला असुन शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला धीराने सामोरे जाण्‍यासाठी कृषि विद्यापीठाच्‍या वतीने ‘उमेद’ उपक्रम कुलगुरु मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत असुन या उपक्रमातंर्गत कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दि १० फेब्रुवारी रोजी माळसोन्‍ना येथे कार्यक्रम घेण्‍यात आला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले तर जल व्‍यवस्‍थापन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ ए एस कडाळे, गांवचे सरपंच मधुकरराव लाड, विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे, मुख्‍याध्‍यापक आर एन शिंदे, प्रल्‍हाद लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ डि एल जाधव पुढे म्‍हणाले, की मानवाचे आयुष्‍य हे अमुल्‍य असुन शेतक-यांनी मित्राशी व कुटुबातील सदस्‍याशी संवाद साधल्‍यास मनातील दु:खाचे मळभ दुर होतील. अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले, की शेतक-यांनी एकाच पीकाच्‍या मागे न लागता, या भागातील हवामान व जमिनीचा अभ्‍यास करून पीकांची निवड करावी. बाजारात भाव असेल तेव्‍हा बाजारात शेतमाला विक्रीसाठी आणण्‍याची एैपत जेव्‍हा शेतक-यांत येईल, तेव्‍हाच शेतक-यांची प्रगती होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. जल व्‍यवस्‍थापन शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे यांनी आपल्‍या भाषणात मुलस्‍थानी जलसंधारण, शेततळे, शेतीची बांधबंदिस्‍ती आदी विषयावर मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ राकेश आहिरे यांनी केले तर सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे व आभार प्रदर्शन गोविंद लाड यांनी केले. मुख्‍याध्‍यापक श्री आर एन शिंदे यांच्‍या सहकार्याने शाळेच्‍या विद्यार्थ्‍याची गावात प्रभातफेरी काढुण जागर करण्‍यात आला. कार्यक्रमास गांवातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी तुकाराम दहे, चद्रशेखर नखाते, कृषि अधिकारी बी पी घोगाळे, ग्रामसेवक श्री चिलगर, कृषि सहायक श्री मानोलीकर, तलाठी श्री झिंगे, उपसरपंच बालासाहेब पुर्णे, केशवराव चव्‍हाण, माणिक चव्‍हाण, मुजांजी लाड, आनंद लाड, कृषि विस्‍तार विभागाचे विद्यार्थी यांनी सहाकार्य केले. 
गावातुन प्रभारफेरी काढण्‍यात आली त्‍याप्रसंगी