Friday, February 27, 2015

इंदेगाव (ता.पैठण जि. औरंगाबाद) येथे आद्यरेषीय गहू प्रात्याक्षिकांतर्गत शेतकरी मेळावा संपन्न

सुधारित बियाण्‍यामुळे गहू उत्‍पादनात वाढ शक्‍य.......संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या गहू व मका संशोधन केंद्र व कर्नाल (हरीयाणा) येथील गहू संशोधन संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आद्यरेषीय गहू प्रात्‍यक्षिकांतर्गत इंदे्गाव (ता.पैठण जि. औरंगाबाद) येथे २५ फेब्रवारी रोजी शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेट आयोजित करण्‍यात आले होते. मेळाव्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर सरपंच अशोकरावजी बाबर, राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाचे शास्‍त्रज्ञ डॉ. बी. जी. हिरवाळे, गहू व मका पैदासकार डॉ. व्हि. डी. साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. इंदेगाव येथील शेतक-यांच्‍या शेतावर प्रात्‍यक्षिकांतर्गत कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्‍या एमएसीएच-६४७२ या गव्‍हाच्‍या सुधारित वाणांची लागवड करण्‍यात असुन सध्‍या पीकांची वाढ समाधानकारक आहे.
यावेळी अध्‍यक्षीय भाषणात डॉ. डी. पी. वासकर यांनी गव्‍हाच्‍या प्रतवारी, प्रक्रीया, पॅकेजिंग, इत्‍यादीचे महत्‍व विषद करून सुधारीत वाण व लागवड तंत्रज्ञानाच्‍या वापरामुळे गव्‍हाच्‍या उत्‍पादनात हमखास वाढ होणार असल्‍याचे सांगितले. तसेच शेतक-यांनी आर्थिकर्स्‍थयेतेसाठी फळबाग लागवडीकडे वळावे असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. शास्त्रज्ञ डॉ. बी. जी. हिरवाळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गव्‍हाच्‍या सुधारीत वाण व लागवड तंत्रज्ञानाच्‍या वापरामुळे होणा-या उत्‍पादन वाढीचा आढावा घेण्‍यात आला.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ. व्‍ही. डी. साळुंके यांनी गहू पिकाच्‍या सुधारीत लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल मुंढे यांनी केले तर रामेश्‍वर ठोंबरे यांनी आभार मानले. मेळाव्‍यास शेतकरी बंधु भगिनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. रोहित सोनवणे, राहूल झोटे, सचिन रणेर आदींनी परिश्रम घेतले.