Thursday, March 26, 2015

मराठवाडयातील शेतीला स्‍थैर्य देण्‍यासाठी जलसंधारण ही काळाची गरज

मौजे चिकलठाणा (बु.) (ता.सेलु जि.परभणी) येथे आयोजीत शेतकरी मेळाव्‍यात कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू यांचे प्रतिपादन
चिकलठाणा (बु) येथील शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर आमदार मा श्री विजयरावजी भांबळे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, डॉ उदय खोडके आदी. 

हवामान बदलामुळे निर्माण झालेले कोरडवाहू शेतीचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी एकञ येऊन प्रत्‍येक गावात सामुहिक तत्‍वावर मृद व जलसंधारणाचे उपाय केल्‍यास शेतीला निश्चितपणे स्‍थैर्य प्राप्‍त करुन देता येईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू यांनी केले. जलसंधारण दिनाचे औचित्‍य साधुन राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंञज्ञान माहिती केंद्र, राष्‍ट्रीय केमीकल्‍स अॅन्‍ड फर्टिलायझर्स लिमीटेड व चिकलठाणा येथील जय किसान सेवा शेतकरी मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २२ मार्च रोजी मौजे चिकलठाणा (बु.) (ता.सेलु जि.परभणी) येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणून आमदार मा. श्री. विजयराव भांबळे हे उपस्थित होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले, प्राचार्य डॉ. उदय खोडके, जि.प. सदस्‍य डॉ. जगन्‍नाथ जाधव, पं.स. सदस्‍य श्री. संपत राठोड, सरपंच श्री. आसीम खॅा पठाण, श्री. बप्‍पासाहेब खरात, श्री. किशोर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, भूजलाचा उपसा मोठया प्रमाणात वाढत असुन मराठवाडा विभागात सर्वच जिल्‍हयात भुजलपातळी खोलवली आहे. भूजलपातळीचा अंदाज घेउनच भूजलाचा उपसा करावा. कुपनलीकांची खोली वाढवुन पाण्‍याचा प्रश्‍न सुटणार नाही. जलसंधारणाच्‍या विविध माध्‍यमातून पावसाच्‍या पाण्‍याचा कार्यक्षम व योग्‍य वापर करणे आवश्‍यक आहे. उपलब्‍ध पाणी व सिंचन यांचा विचार करून एकूणच पिक पध्‍दतीत बदल करण्‍याची गरज आहे. शेतक-यांनी ठिबक सिंचनाशिवाय ऊस घेऊ नये, मराठवाडयातील शेतक-यांनी ऊस पिकाच्‍या मागे न लागता, उपलब्‍ध सिंचनावर सोयाबीन व तुर या आंतरपीकाची लागवड करावी किंवा खरीपमध्‍ये सोयाबीन व रब्‍बीमध्‍ये ज्‍वारी पीक घेतल्‍यास प्रति हेक्‍टरी ऊसापेक्षा जास्‍त आर्थिक नफा मिळवता येऊ शकतो. शेतक-यांची गरज लक्षात घेऊन कृषि विद्यापीठ काम करत असून या आपत्‍कालीन परिस्थितीत शेतक-यांच्‍या पाठीशी आहे, असे त्‍यांनी सांगितले.
मेळाव्‍यात आमदार मा. विजयराव भांबळे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेतकरी बांधवांनी निराश न होता आधुनिक तंञज्ञानाचा वापर करुन आणि राज्‍यातील यशस्‍वी शेतक-यांपासुन प्रेरणा घेऊन जिद्दीने व चिकाटीने काम केल्‍यास परिस्थितीवर मात करता येईल. शेतकरी बांधवांनी परिसरातील नाल्‍यांचे खोलीकरण, रुंदीकरण, शेततळयातील गाळ काढणे तसेच ग्रामबिजोत्‍पादन कार्यक्रमातुन गावाचा विकास साधावा, असे आवाहनही त्‍यांनी केले.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले यांनी शेतकरी बांधवांनी सद्य परिस्थितीत खचून न जाता विद्यापीठाचे कमी खर्चाचे तंञज्ञान वापराण्‍याचे आवाहन केले. यावेळी जलसंधारणावर प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कृषि तंञज्ञान केंद्राचे डॉ. आनंद गोरे यांनी कृषि विद्यापीठाचे विस्‍तार उपक्रमाबाबत माहिती दिली तर तालुका कृषि अधिकारी श्री. राम रोडगे यांनी जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत विविध योजनांची माहिती दिली.
मेळाव्‍यात प्रगतशील शेतकरी श्री. ओमप्रकाश चव्‍हाळ यांचा आमदार मा. श्री. विजयराव भांबळे यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तसेच कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू यांच्‍या हस्‍ते जलयुक्‍त शिवार अभियानांर्तगत बंधा-यातील गाळ काढण्‍याच्‍या कामाचे उद्घाटन करण्‍यात आले. शेतक-यांत उमेद निर्मीतीसाठी गावात शालेय विद्यार्थ्‍याची प्रभातफेरी काढुन जागर करण्‍यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा परिषद सदस्‍य डॉ. जगन्‍नाथ जाधव यांनी केले तर सुञसंचालन श्री. अशोक जाधव यांनी केले. तांञिक चर्चात शेतक-यांना कोरडवाहू फळपिक व्‍यवस्‍थापनावर प्रा बी. एस. कलालबंडी, विहीर पुनर्भरणावर प्रा. एम. एस. पेंडके, कोरडवाहू शेतीचे व्‍यवस्‍थापनावर डॉ. आनंद गोरे, माती परिक्षणावर डॉ. पपीता गौरखेडे, शेततळयाची देखभाल व निगा यावर प्रा. मधुकर मोरे तर रासायनिक खतांचा संतुलीत वापर यावर श्री. पानझाडे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. शेतक-यांच्‍या प्रश्‍नांना व शंकांवर शास्‍ञज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी गावातील शेतकरी गटाचे श्री. कुडंलिक टाकसाळ, श्री. किशोर नाईक, श्री. संतोष घोळवे, श्री. गजानन जाधव, श्री राजाभाऊ कारंडे, श्री. गोरख बुधवंत यांनी तर कृषि विद्यापीठाचे श्री. सुधीर जाधव, श्री. राहुल मांडवगडे, श्री. श्रीकांत ईक्‍कर यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्‍यास सेलू तालुक्‍यातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थिती होते.