Tuesday, December 29, 2015

मौजे तुळजापूरवाडी (ता.वसमत जि.हिंगोली) येथे जय किसान–जय विज्ञान सप्‍ताहांतर्गत गटचर्चा व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्‍न

माजी पंतप्रधान भारतरत्‍न माननीय डॉ. अटलबिहारी वाजपेयी व माननीय चौधरी चरणसिंह यांच्‍या जन्‍मदिवसाचे औचित्‍य साधुन दि. २३ ते २९ डिसेंबर दरम्‍यान जय किसान–जय विज्ञान सप्‍ताहांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापिठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व तालुका कृषि अधिकारी, वसमत यांच्‍या संयुक्‍त विदयमाने वसमत तालुक्‍यातील मौजे तुळजापूरवाडी येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी शेतकरी गटचर्चा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले होते. गटचर्चेत कृषि माहिती तंत्रज्ञान केंद्राचे विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी मार्गदर्शनात शेतक-यांनी गट स्‍थापन करुन शेती करावी व भविष्‍यात गटाव्‍दारे कंपनीची स्‍थापना करुन विविध प्रक्रिया उदयोग करण्‍याचा सल्‍ला दिला तर विदयापीठ विकसीत विविध वाण व तंत्रज्ञान यांचा वापर करुन शेतीचे उत्‍पादन वाढविण्‍याबाबत मार्गदर्शन केले. किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी शेतक-यांना किड व्‍यवस्‍थापनाविषयी माहिती देतांना किड व्‍यवस्‍थापनात खर्चाचे नियोजन करणे गरजेचे असुन केवळ किटकनाशकांचा फवारणी न करता एकात्मिक पध्‍दतीचा वापर करुन किटकनाशकांवरील खर्चात बचत करावी असे सांगितले. कृषि विभागाचे श्री. के. एस. घुगे यांनी शेतक-यांना शेतकरी कंपनी स्‍थापन करण्‍याविषयीचे मागदर्शन करून तुळजापूरवाडी येथे कृषिविभागातर्फे राबविण्‍यात येणा-या जलयुक्‍त शिवार कार्यक्रमाविषयी माहिती दिली. 
यावेळी शेतक-यांनी निंबोळी अर्क तयार करणे, पाणी नियोजन आदी विषयांवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांशी चर्चा केली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावातील ज्‍येष्‍ठ नागरिक गुलाबराव चव्‍हाण हे होते तर कृषि विभागातर्फे आर. एस. नवघरे, एन. व्हि. लोखंडे, अशोक चव्‍हाण यांनी सहभाग नोंदविला. शास्‍त्रज्ञांनी शेतकरी अर्जून चव्‍हाण यांच्‍या हळदीच्‍या शेतावर भेट देऊन मार्गदर्शन केले.