वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि लातुर
येथील जिल्हा मृद सर्व्हेक्षण चाचणी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात जमिनीचे गुणधर्म व पाणी तपासणी विषयावर पाच
दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १२ ते १६ जुलै दरम्यान करण्यात आले
आहे. सध्या जमिनीमध्ये एकापेक्षा अधिक अन्नद्रव्यांच्या कमतरता आढळून येत असल्यामुळे
जमिनीचे आरोग्य बिघडले आहे, या संदर्भात आंतरराष्ट्रीयस्तरावर जमिनीच्या
आरोग्याबाबत जागृती होण्यासाठी गतवर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणुन साजरे केले
तसेच केंद्र व राज्य शासनस्तरावरही मृदा आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रमावर भर
देण्यात येत आहे. आरोग्य पत्रिकेत जमिनीचे गुणधर्म व पाणी तपासणीचे विश्लेषण द्यावे
अशा मार्गदर्शक सूचना जिल्हास्तरावरील माती परीक्षण प्रयोगशाळेस प्राप्त झाल्या
आहेत. यासाठी कृषि विभागातील माती परिक्षण प्रयोगशाळेतील विविध तंत्र अधिकारी
यांना प्रयोगशाळेत जमिनीच्या गुणधर्म व पाणी तपासणीतील येणा-या तांत्रिक अडचणी सोडवीता
याव्यात व जमिनीच्या आरोग्याबाबत शेतकरी वर्गात जागरुकता निर्माण करण्यासाठी सदरिल
प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांच्या मागदर्शनाखाली पाच
दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रशिक्षणासाठी मराठवाडयाच्या आठही
जिल्हयातील तंत्र अधिकारी आणि तंत्रज्ञ कृषि सहाय्यक सहभाग नोंदविणार आहेत.