Tuesday, August 30, 2016

वनामकृवित राष्‍ट्रीय पातळीवरील करडई व जवस पीकासंबंधी शास्‍त्रज्ञांची वार्षिक गट बैठकीचे आयोजन

देशपातळीवरील करडई व जवस पीकाच्‍या संशोधनाची ठरणार दिशा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे राष्ट्रीय पातळीवरील करडई व जवस पीकांसंबंधी शास्‍त्रज्ञांची वार्षिक गट बैठकीचे आयोजन दिनांक २ ते ४ सप्टेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन बैठकीच्‍या उद्घाटनास नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक मा. डॉ. जे. एस. संधु उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थान कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे भुषविणार आहेत. अशा प्रकारची शास्‍त्रज्ञांची तेलबिया विषयक वार्षिक गट बैठक विद्यापीठात प्रथमच संपन्‍न होत असुन बैठकीस महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा, आसाम, मेघालय आदी राज्यामधुन करडई व जवस पीकासंबंधी १२० शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहे.
तीन दिवस चालणा-या सदरिल बैठकीत करडई व जवस पिकांच्‍या संशोधनाबाबत चर्चा होणार असुन बैठकीत नवीन वाण प्रसारणाबाबत शिफारस करण्यात येणार आहे. देशापातळीवरील संशोधनाची दिशा ठरविण्‍यात येणार असुन या महत्वाच्या तेलबिया पिकांची उत्पादकता व क्षेत्र वाढीसाठी मदत होणार आहे. करडई पिकांच्‍या वाणाबाबत वनामकृविचे मोठे योगदान असुन अखिल भारतीय समन्‍वयीत करडई संशोधन प्रकल्पाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ विकसित परभणी कुसुम (परभणी-१२), बिनकाटेरी वाण परभणी-४०, परभणी ८६ (पुर्णा) आदी करडईच्या वाणांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहेत. विद्यापीठ विकसित करडईचे परभणी-१२ या वाणाची देशात मोठया क्षेत्रावर लागवड केली जाते. परिषदेच्या आयोजनासाठी संशोधक संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या असुन विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी परीश्रम घेत आहेत.