वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण महिला व बालकांचे
योगदान, आरोग्य व विकास वृध्दींगत
करण्याच्या दृष्टीने कृषि विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विषयतज्ञ व
कार्यक्रम समन्वयक यांच्या करिता तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन
दिनांक २० ते २२ सप्टेंबर दरम्यान करण्यात होते, कार्यशाळेचा समारोपीय
कार्यक्रम दिनांक २२ सप्टेंबर रोजी कुलगुरू मा. डॉ. बी.
व्यंकटेश्वरलु यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ.
अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी.
बी. भोसले, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांची प्रमुख
उपस्थिती होती. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास भुवनेश्वर येथील केंद्रीय कृषीरत महिला संस्थेच्या
संचालिका डॉ. जतिंदर किश्तवारिया, हैद्राबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्थेचे
संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवसीय कार्यशाळेत
शेतकरी महिलांची कार्यक्षमता वृध्दिंगत करण्यासाठी व त्यांचे काबाडकष्ट कमी
करण्याचे तंत्र व साधने, ग्रामीण महिला व बालकांचे आरोग्य, विकास व योगदान
वृध्दिंगत करण्याचे महत्व, बाल संगोपन विकासदर्शक संवर्धनासाठी पोषक घरगुती
वातावरण, मानसिकरित्या दुर्बल बालकांना ओळखण्यासाठी सोपे तंत्र, मतिमंद बालक जन्माला
येण्याची कारणे व प्रतिबंधक उपाय, बालकाचा वाढांक मोजण्याचे तंत्र, तृणधान्याच्या
व कडधान्याच्या मुल्यवर्धीत पाककृती, लोह समृध्द पाककृती, आळीव व नाचणीच्या
पोषक पाककृती, कृपोषण निर्मूलन कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शीका, सोयाबीन
कापणी व मळणीसाठी संरक्षीत कपडे, पर्यावरणपुरक होळी व कपडयाचे रंग आदीं विषयांवर
विविध साधनव्यक्तींनी प्रात्यक्षिके व कार्यानुभवाव्दारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी
गृहविज्ञान विषयक पुस्तके व शेती अवजारे यांचे प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते. सदरिल कार्यशाळेत राज्यातील विदर्भातील
आठ, पश्चिम महाराष्ट्रातुन तीन, कोकण व खानदेशातुन प्रत्येकी एक तर मराठवाडातुन
आठ गृहविज्ञान विषयतज्ञांचा समावेश होता. एकुण २१ कृषी विज्ञान केंद्रातील
गृहविज्ञान विषयतज्ञ व ६ कार्यक्रम समन्वयक यांनी सहभाग नोंदविला. समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमात
सहभागी प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात
आले. कार्यशाळेचे प्रमुख समन्वयिका म्हणुन प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांनी
तर आयोजन सचिव म्हणुन वरिष्ठ संशोधिका डॉ. जयश्री झेंड यांनी काम पाहिले. प्रास्ताविकात
सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम यांनी विविध गृहविज्ञान
तंत्रज्ञानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नाहिद खान यांनी केले
तर आभार डॉ. जयश्री झेंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारतीय समन्वयीत
संशोधन प्रकल्प व गृहविज्ञान महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्यापकवृंद यांनी
परिश्रम घेतले. समारोपीय कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी
मोठया संख्येने उपस्थित होते.