Wednesday, September 21, 2016

कृषी अभियंत्‍यानी शेतक-यांसाठी कार्य करावे....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न अभियंता डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन म्हणून साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्रा. भास्कर भुईभार, डॉ. स्मिता खोडके, प्रा. हरीश आवारी, प्रा. स्मिता सोलंकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्‍हणाले की, कृषी अभियांत्रिक क्षेत्रात अनेक बाबींवर संशोधन करण्यास मोठा वाव आहे. पाणलोट क्षेत्र विकास, सिंचन पद्धती, यांत्रिकीकरण, अपारंपरिक उर्जा, प्रक्रिया व मूल्यवर्धन आदी विषयात संशोधन करून शेतकऱ्यांचे परिस्थितीत सुधारणासाठी व त्यांचे जीवन मूल्य उंचावण्यासाठी कृषी अभियंत्यांनी प्रयत्नशील रहावे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी अभियांत्रिकी मध्ये दर्जात्मक शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उत्तम संशोधन करून शेतक-यांसाठी कार्य करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
प्राचार्य डॉ. उदय खोडके आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, डॉ. एम. विश्वेश्वरय्या हे उत्कृष्ट अभियंता सोबतच उत्तम प्रशासक, बुद्धीवंत, अर्थतज्ञ व मुत्सद्दी होते. त्‍यांच्‍या तंत्रज्ञानाची तत्कालीन ब्रिटीश सरकारने दखल घेऊन डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांचा गौरव केला होता तर भारत सरकारने त्यांना भारतरत्न देऊन गौरविले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातील वेळेचे व्यवस्थापन, प्रामाणिकपणा व कामासाठी समर्पण आदी बाबींचे अवलंबन करावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सीताराम बाच्छे व वृषाली खाकाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन संदेश खरात यांनी केले. कार्यक्रमात कल्पना भोसले, जान्हवी जोशी, अमृत मुडके, उमेश पवार आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र शिंदे व संजय पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. सुमंत जाधव, प्रा. दयानंद टेकाळे, प्रा. सुभाष विखे, प्रा. गोपाळ शिंदे, प्रा. मधुकर मोरे, प्रा. संदीप पायाळ, प्रा. श्याम गरुड, प्रा. संजय पवार, प्रा. रवींद्र शिंदे, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे आदीसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप - सदरिल बातमी प्राचार्य, कृषी अभियांंत्रिकी महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त