Friday, December 15, 2017

मानव व पशुचे आरोग्‍य हे जमिनीच्‍या आरोग्‍यावरच अवलंबुन....अमेरिकेतील ओहीओ स्‍टेट विद्यापीठ अमेरिकचे शास्‍त्रज्ञ मा. डॉ रतन लाल

जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणार परिणाम यावरील आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्रात प्रतिपादन
महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणारे परिणाम या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासञ दि. १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत वाल्मी औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात असुन चर्चासत्रात दिनांक १४ डिसेंबर रोजी अमेरिकेतील ओहीओ स्‍टेट विद्यापीठ अमेरिकचे शास्‍त्रज्ञ मा. डॉ रतन लाल यांचे हवामान बदल व शेती यावर विशेष व्‍याख्‍यान झाले. सदरिल तांत्रिक सत्राचे अध्‍यक्ष इजिप्‍तचे कृषि शास्‍त्रज्ञ डॉ अदेल अल बेलतागी हे होते तर उपाध्‍यक्ष माजी कुलगुरू डॉ एम सी वरश्‍नीय हे होते तसेच डॉ सय्यद ईस्‍माईल व डॉ आर एन काटकर यांनी सत्र संकलक म्‍हणुन काम पाहिले.
यावेळी मा. डॉ रतन लाल म्‍हणाले की, जमिन ही सजीव आहे, त्‍यात अनेक सुक्ष्‍मजीव व जंतु असतात. वातावरणातील वाढते तापमान तसेच किटकनाशके, रासायनिक खते, मशागत आदींच्‍या अतिरेकामुळे जमिनीचा जीवंतपणा कमी होऊन जमिन र्निजीव होत आहे. जर जमीनीचे आरोग्‍य बिघडले तर मानव व प्राणी मात्राचे देखिल आरोग्‍यावर ही विपरित परिणाम होणार आहे. जमिन जीवंत ठेवण्‍यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे, यासाठी पिकांचे अवशेष महत्‍वाची भुमिका बजावु शकते. शेतक-यांनी पिकांचे अवशेष न जाळता जमिनीत पुर्नवापर करावा. भारतातील जमिनीत सेंद्रिय कर्बचे प्रमाण कमी होत असुन यामुळे पिक उत्‍पादनात शाश्‍वतता टिकविणे कठिण होणार आहे. जमिनीस केवळ नत्र, स्‍फुरत व पालाश पुरविण फायदयाचे नसुन शाश्‍वत उत्‍पादनासाठी सेंद्रिय कर्ब अत्‍यंत आवश्‍यक आहे. भारतातील वाढत्‍या लोकसंख्‍येकरिता अन्‍नसुरक्षेसाठी जमिनीचे आरोग्‍य टिकविणे गरजेचे आहे. देशात शहरीकरणासाठी घरे बांधण्‍यासाठी विटांचा वाढता वापर ही चिंता विषय झाला असुन विट तयार करण्‍यासाठी सुपिक मातीचा वापर होत आहे, हे थांबविणे गरजेचे आहे. शेती करता माती व पाणी यांचा काटेकार वापर करून हवामान बदलाचे परिणाम कमी करता येऊ शकते. जमिनीवर वृक्षांची लागवड करणे, शेतात वापरण्‍यात येणा-या विविध निविष्‍ठांची कार्यक्षमता वाढविणे व सेंद्रिय घटकांचा नियमित वापर करणे अत्‍यंत गरजचे आहे. यासर्व बाबींची माहिती देशातील नियोजन करणा-या यंत्रणेला अवगत करण्‍याची गरज असुन यासाठी धोरणात्‍मक निर्णय घेण्‍याची वेळ आली आहे, असे मत जागतिक र्कीतीचे शास्‍त्रज्ञ डॉ रतन लाल यांनी व्‍यक्‍त केले.
तीन दिवसीय चर्चासत्रात दिनांक 14 रोजी विविध विषयावर चार तांत्रिक सत्र संपन्‍न झाली, यात जागतिक स्‍तरावरील कृषि शास्‍त्रज्ञ ऑस्‍ट्रेलियाचे डॉ जॉन डिक्‍सन, इजिप्‍तचे डॉ अदेल अल बेलतागी, स्वित्‍झर्लंडचे डॉ शिवकुमार, मुंबईचे डॉ सुरेश कुलकर्णी, नवी दिल्‍ली येथील डॉ एम सी सक्‍सेना, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे डॉ के व्‍ही प्रभु, महकोचे डॉ भारत चार, डॉ कुलदिप सिंग आदींची सादरिकरण झाले. दिनांक 15 रोजी पाच तांत्रिक सत्र पार पडली यात डुपॉन्‍टचे डॉ अमित मोंहती, बारामती येथील डॉ जगदीश राणे, हैद्राबाद येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. व्‍ही प्रविण राव, जैन इरिगेशचे डॉ सोमनाथ जाधव, ऑस्‍ट्रेलीयाचे डॉ कार्ल डामीन, नार्म हैद्राबादचे संचालक डॉ श्रीनिवास राव, जोधपुर येथील डॉ ओ पी यादव आदीचे विविध विषयावर सादरीकरण झाले. तसेच राज्‍यातील स्‍वत:चे नवतंत्रज्ञानाच्‍या आधारे बदलत्‍या हवामानास यशस्‍वी तोंड देऊन शेती व शेतीपुरक जोडधंद्यात शाश्‍वत उत्‍पादन घेत असणा-या शेतक-यांनी ही उपस्थित शास्‍त्रज्ञ समोर सादरिकरण केले. 

हैद्राबाद येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. व्‍ही प्रविण राव आपल्‍या सादरिकरणात तेलगंणा राज्‍यात सुक्ष्‍मसिंचनामुळे मोठया प्रमाणात शेती सिंचनाखाली येऊन शेतक-यांचे उत्‍पादनात भरीव वाढ झाल्‍याचे दाखवुन दिले तसेच देशातील शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी सुक्ष्‍मसिंचनाचा आधार घ्‍यावा लागेल असे प्रतिपादन केले.  

सदरिल चर्चासत्राचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे यजमानपद आहे. चर्चासत्रात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, श्रीलंका, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ आदीं देशांतील नामवंत शास्त्रज्ञासह सुमारे ८०० हुन अधिक शास्‍त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत.

चर्चासत्राचे सहआयोजक महिको, जालना असुन सहभागी संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, जैन इरीगेशन, जळगांव, भारतीय स्टेट बँक, महाबीज, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, टास नवी दिल्ली, विज्ञान व अभियांत्रिकी मंडळ, नवी दिल्ली हया आहेत. अनेक खाजगी कंपन्या आणि विविध संस्था या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.