Friday, December 29, 2017

वातावरणातील तापमान वाढीत तग धरण्‍याची क्षमता देशी गोवंशात......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित सकाळ वाचक महोत्‍सव अंतर्गत देशी गोवंशाचे महत्‍व या विषयावर व्‍याख्‍यान

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व सकाळ माध्‍यम समुहाच्‍या वतीने सकाळ वाचक महोत्‍सव अंतर्गत दिनांक 29 डिसेंबर रोजी विद्यापीठात देशी गोवंशाचे महत्‍व या विषयावर पशु वैद्यकिय व पशु विज्ञान महाविद्यालयाचे जेष्‍ठ पशुतज्ञ तथा विभाग प्रमुख (पशु प्रजनन) डॉ नितीन मार्कडेय यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, सकाळ समुहाचे श्री कुणाल मांडे, प्रगतशील पशुपदौसकार श्री एकनाथराव साळवे, श्री रामेश्‍वर मांडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, हवामान बदलाचा परिणाम शेती व पशु वर होत असुन तापमान वाढीमुळे दुध उत्‍पादनावरही मोठा परिणाम होत आहे. मराठवाडयातील देवणी व लाल कंधारी देशी गोवंश वातावरणातील तापमान वाढीस सहनशील असुन शाश्‍वत दुध उत्‍पादन व प्रजोत्‍पादन क्षमता त्‍यात आहे. त्‍यामुळे या प्रजातीचे सवंर्धन व संगोपन करणे गरजेचे आहे. या देशी गोवंशच्‍या शुध्‍द पैदासीतुन भविष्‍यात पशुपालकामध्‍ये आर्थिक स्‍थेर्य प्राप्‍त होऊ शकते.
डॉ नितीन मार्कडेय आपल्‍या व्‍याख्‍यानात म्‍हणाले की, देशी गोवंशाच्‍या दुधातील प्रथिनांमध्‍ये अनेक आरोग्‍यवर्धक गुणधर्म असुन बालकांचा बुध्‍दांक वाढ होते. देशी गोवंश शुध्‍दतेसाठी सर्वांना प्रयत्‍न करावे लागतील. अनेक पशुपालक हे संशोधक वृत्‍तीने गोवंशाची जोपासना करतात. या पशुपालकांना प्रोत्‍साहन देण्‍याची गरज आहे. देशी गोवंशाच्‍या गायीचे गोमुत्र व शेणास आयुर्वेदात औषधी महत्‍व असुन गायीचा चिक ही आरोग्‍य रक्षक आहे. गायीचे गर्भजलात बीजवणक्षमता असते, त्‍यामुळे जखम भरून येण्‍यासाठी मदत होऊ शकते तसेच देशी गायीच्‍या झारातील स्‍टेम सेलचा वापर अनेक आजारावर उपचार करण्‍यासाठी होऊ शकतो. अध्‍यात्‍ममध्‍ये देशी गायीचे महत्‍व अधोरेखित आहेच परंतु आपणास देशी गायीकडे वैज्ञानिक दृष्‍टीकोनातुन पाहावे लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
देशी गोवंशाबाबत जनजागृती होणे आवश्‍यक असल्‍याचे मत प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात सकाळ प्रकाशनामार्फत प्रकाशीत झालेल्‍या देशी गोवंश या पुस्‍तकाची प्रत भेट म्‍हणुन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी माननीय कुलगुरू यांना दिली. पुस्‍तकाच्‍या लेखनात डॉ नितीन मार्कडेय, श्री अमित गद्रे, डॉ बाबासाहेब ठोंबरे यांचा सहभाग असुन अल्‍पावधीतच सदरिल पुस्‍तकाची चौथी आवृत्‍ती प्रकाशित झाली आहे.  
कार्यक्रमाचे प्रास्‍तविक डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आनंद शिंदे यांनी केले तर आभार डॉ शंकर नरवाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ दत्‍ता बैनवाड, प्रा नरेंद्र काबळे, विजय सावंत, सुभाष जगताप, माधव मस्‍के आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पशुपालक, विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.