Friday, December 8, 2017

कापुस पिकात पुढील हंगामात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्‍हणुन आताच उपाययोजना करण्‍याची गरज


वनामकृवि व कृषि विभागाचे आवाहन
मराठवाडयामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठया प्रमाणात दिसुन येत आहे. या संदर्भात पुढील हंगामात प्रादुर्भाव कमी राहण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना घेण्याचे आवाहन कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्या मार्फत करण्यात येत आहे. मराठवाडयामध्ये बहुतांश क्षेत्रावर बी.टी. कापसाची लागवड केली जाते. पुढील हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आत्तापासुनच एकात्मीक किड व्यवस्थापनचा अवलंब करणे गरजेचे आहे.
·     ब-याच क्षेत्रामध्ये थोडयाश्या आर्थिक लाभासाठी कापूस पिकाची फरदड घेतली जाते, त्यामुळे गुलाबी बोंडअळीला जीवनक्रम पुर्ण करण्यासाठी सततचे खाद्य मिळते. पुढील हंगामात तिचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होण्याची शक्यता असते. म्हणून फरदड न घेता वेचणी पुर्ण झालेल्या शेतातील प-हाटया उपटून त्या नष्ट करणे गरजेचे आहे.
·   उपटून टाकलेल्या प-हाटयांच्या नख्यांमध्ये सुध्दा शेंदरी बोंडअळी सुप्त अवस्थेत राहते. त्यामुळे अशा प-हाटया, शेतात पडलेली बोंडं व नख्या वेचून कंपोस्‍ट खड्डयामध्ये गाडावे.
·   पुढील हंगामातील कापसाच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी राहण्यासाठी दोन पीकामध्ये कमीत कमी पाच ते सहा महिण्याचे अंतर आवश्यक आहे.
·  चालु हंगामातील गुलाबी बोंडअळीचे कोष जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत राहात असल्यामुळे शेताची खोल नांगरट करावी जेणेकरुन पक्षी कोष खाऊन नष्ट करतात.
·       कापुस पिकाची वेचणी पुर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात जनावरे, गुरे व शेळया मेंढया चरण्यासाठी सोडावी. गुरे चरण्यास सोडण्यापुर्वी पीकावर किमान एक महिण्याअगोदर फवारणी झालेली नाही याची खात्री करावी.
·    कापसातील बियाण्यास गुलाबी बोंडअळी खात असल्यामुळे जिनींग व प्रेसिंग मिल परिसरात गुलाबी बोंडअळीचे कोष, पतंग इत्यादी आढळून येतात. त्यामुळे त्याठिकाणी प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावणे आवश्यक आहे. सापळयामध्ये जमा झालेले पतंग रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकुन नष्ट करावेत.
·     जिनींग प्रेसिंग मिलमधील किडग्रस्त सरकी वेगळी करुन बाजुला काढल्या जातात. अशा सरकी जिनींग मिल व्यवस्थापनाने उघडयावर न ठेवता नष्ट करणे आवश्यक आहे.
·    पुढील हंगामात कापुस पिकात फुले लागण्याच्या वेळी कामगंध सापळयांचा वापर करणे आवश्यक आहे.
·   चालु हंगामातील पीक काढल्यानंतर त्या पीकावर प्रादुर्भाव झालेल्या किडींचे कोष जमिनीमध्ये सुप्तावस्थेत राहतात. पुढील हंगामात तेच पीक त्याच जमिनीवर घेतल्यास कीडींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे जमिनीवर पीकांची फेरपालट करणे नितांत आवश्यक आहे. एकाच जमिनीवर पुन: पुन्हा एकच पीक घेऊ नये.
अशा प्रकारे पुढील वर्षाच्‍या हंगामात गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आत्‍ताच प्रतिबंधक उपाययोजनाचा अवलंब शेतकरी बांधवानी करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांनी केले आहे.