Tuesday, August 7, 2018

पावसाच्या खंडकाळात कोरडवाहू पिकाचे व्यवस्थापन

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पोटॅशियम नायट्रेट फवारणीचा वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

मराठवाडयात या वर्षी पावसाळा अगदी वेळेवर सुरु झाला, जुन व जुलै महिन्यात काही तुरळक तालुके वगळता साधारणपणे सर्वत्र चांगला पाऊस झाला तसेच पेरण्याही वेळेवर झाल्या. परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या पुढेही आठवडाभर तुरळक पाऊस पडण्याची शक्यता दर्शविली आहे. दरवर्षी पावसाची परिस्थिती वेगवेगळी असते, पावसाचे वितरण वेगवेगळे असते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये मागील 50 वर्षाच्या पावसाच्या आकडेवारीचे पृथ्थकरण केले असता असे आढळून आले की, जुलै व ऑगस्ट महिन्या मध्ये हमखास पावसाचा खंड पडतो,  या पावसाच्या खंड काळात कोरडवाहू पिके वाचविणे हे फार मोठे आव्हान असते. सन 2015 मध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात 45 - 50 दिवसाचा पावसामध्ये खंड पडला होता, त्यामुळे कोरडवाहू पिके वाळून गेली होती. अशा पावसाच्या खंड काळात कोरडवाहु पिकांचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे केल्यास पिकावर पडणारा पाण्याचा ताण काही अंशी कमी होऊन पिक उत्पादनात होणारी घट निश्चितच कमी होऊ शकते, असे सल्‍ला अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे शास्‍त्रज्ञ डॉ.भगवान आसेवार व  डॉ. मदन पेंडके यांनी दिला आहे.
बीटी कापूस : कापसाचे पिक सध्या फुलोरा, पाते लागणे या अवस्थेत आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वारंवार कोळपणी / वखरणी करावी जेणेकरुन जमिनीवर पडलेल्या भेगा बुजून खालच्या थरातील ओलावा टिकून राहील. जमिनीत जास्त ओलावा नसल्यामुळे पिक मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषणकरु शकत नाही. तसेच पिकावरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणीकरणे आवश्‍यक आहे. यासाठी 200 ग्रॅम पोटॅशियमनायट्रेट 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पिकावर ब­याच ठिकाणी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचा दिसत आहे. शेंदरी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त फुले, पाते गोळा करुन नष्ट करावीत. कामगंध सापळ्याचा वापर करावा. लिंबोळी अर्क 5 टक्के प्रमाणे सलग 8 दिवसाच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात. पिकामध्ये दोन ओळी / तासा नंतर एक जलसंधारण सरी पाडावी जेणेकरुन पाऊस झाल्यावर सरीमध्ये पाणी जास्त साचुन ओलावा जास्त काळ टिकून राहतो तसेच जास्त पाऊस झाला तर या सरी वाटे जास्तीचे पाणी शेताबाहेर निघून जाते.
निंबोळी अर्काची फवारणी घेवूनही शेंदरी बोंडअळी नियंत्रणात नाही आल्यास प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली प्रति 10  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
सोयाबीन : सोयाबीनचे पीक सध्या फुलोरा या अवस्थेत आहे. पाने खाणारी अळी व खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी प्रोफेनोफॉस याकिटकनाशकाची 50 टक्के प्रवाही 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकावर पाण्याचा ताण कमी करण्यासाठी तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पोटॅशियम नायट्रेट (13:00:45) 200 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयाबीन पिकात पेरणीनंतर 35 दिवसाने प्रत्येक चार ओळी / तासा नंतर एक जलसंधारण सरी बळीराम नांगराच्या सहाय्याने पाडावी. यामुळे पुढे पाऊस पडल्यास जास्तीचे पाणी जमिनीत मुरते व ओलावा जास्त काळ टिकून राहतो. पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी तुषार सिंचनाने द्यावे.
मुग : मुगाचे पिक सध्या फुलोराते शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत. पिकावरील माव्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भूरी रोग आढळून आल्यास गंधकाची 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्यास तुषार सिंचन पध्दतीने पिकास संरक्षित पाणी द्यावे.
मका : मका हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. खोडकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी कार्बोफ्युरान 3 टक्के 13 किलो प्रती एकर जमिनीतुन द्यावे. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास तुषार सिंचनाने संरक्षित पाणी द्यावे.
तुर : तुर पिक हे वाढीच्या अवस्थेत आहे, पिकाची आंतरमशागत करुन पिक तण विरहीत ठेवावे. त्यामुळे ओलावा जास्त दिवस टिकून राहील. आंतरमशागतीची कामे झाल्या नंतर दोन ओळी नंतर एक बळीराम नांगराच्या सहाय्याने एक जलसंधारण सरी काढावी.
ज्या ठिकाणी खरीप पिकाचे क्षेत्र कमी आहे. अशा ठिकाणी आच्छादनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो वाळलेले गवत, सोयाबीन पिकाचा भुसा,  ऊसाचे पाचट, पालापाचोळा, गिरीषुष याचा पाला 3 ते 5 टन प्रती हेक्टरी वापरावा.
धुळ आच्छादन: जमिनीच्या पृष्ठभागावरचा पातळथर हा 8 ते 10 दिवसाच्या अंतराने कोळपणी द्वारा भुसभुसीत करुन घ्यावा. मातीचे जमिनीवर आच्छादन तयार होते. जमिनीमध्ये पडणा­या भेगा बुजून कमी होऊन बाष्पीभवनास अवरोध निर्माण होतो व ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
संरक्षित सिंचन : पावसावर पुर्णत: अवलंबून असलेल्या कोरडवाहु शेतीमध्ये पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे पावसा अभावी जमिनीतील ओलावा कमी होत असून बरोबरच तापमान वाढीमुळे पिकांची पाण्याची गरज वाढत आहे. जुन महिन्यात ब­यापैकी पाऊस झाल्यामुळे बहुतांश भागातील शेततळी पाण्यानी भरलेली आहेत. त्यातील पाण्याचा वापर पिकांना संरक्षीत सिंचन देण्यासाठी करावा. संरक्षित सिंचनासाठी शक्यतोवर तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. वा­याचा वेग कमी असताना सकाळी किंवा सायंकाळी संरक्षित पाणी द्यावे.

सौजन्‍य
डॉ.भगवान आसेवार व  डॉ. मदन पेंडके
अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी