Wednesday, August 8, 2018

परभणी तालुक्यातील बाभुळगाव व उजळंबा येथे हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने दि. 6 ऑगस्‍ट रोजी हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत कोरडवाहु पिकांचे व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम बाभुळगाव व उजळंबा येथील शेतक-यांच्‍या शेतावर घेण्यात आले. कार्यक्रमात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व डॉ. मदन पेंडके यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सद्यपरीस्थितीत पावसाचा पंधरा दिवसाचा खंड पडला असुन सोयाबीन पिकांवर पोटॅशियम नायट्रेट 2 टक्के फवारणी करावी, असा सल्‍ला मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार यांनी दिला तसेच गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तर शेततळ्यातील पाण्याद्वारे पिकांना संरक्षीत सिंचन देण्यासंबंधीची माहिती डॉ. मदन पेंडके यांनी दिली. यावेळी निवडक शेतक­यांना पोटॅशियम नायट्रेट व कामगंध सापळ्याचे वाटप करण्यात आले व त्याबद्दलचे प्रात्यक्षिक शेतक-यांना देण्यात आले. सदरिल उपक्रम मागील सात वर्षापासुन परभणी तालुक्यातील बाभुळगाव व उजळंबा या गावातील शेतक-यांच्‍या शेतावर राबविण्यात येत आहे. बाभुळगाव येथील सरपंच श्री गणेश दळवेश्री माऊली पारधे, उजळंबा येथील सरपंच श्री मोगले आदीसह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.